Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : लक्षात ठेवा, भाजप एकनाथ शिंदेंना रडवणार! अंबादास दानवे पुन्हा बोलले

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील निवडणूका घेत आयोगाने `मास्टर स्ट्रोक` लगावला, अशी चर्चा राज्यात होऊ लागली आहे. आता हा निर्णय महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडतो, हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर आता सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे ती उमेदवारी याद्यांची.

महायुती-महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ अद्याप सुरुच आहे. महायुतीतील जागा वाटपावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. भाजप एकनाथ शिंदेंना एक एक जागेसाठी रडवणार, याचा पुनरुच्चार दानवे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

आताच दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला 'त्याग' शब्दाचे महत्व सांगितले म्हणे! खेळ सुरू झाला आहे. आता तत्व वगैरे सांगून शिंदे गटाच्या जागांची प्राथमिक छाटणी होईल. मग येतील सर्व्हे, मग येतील उमेदवार बदलायच्या अटी. लक्षात ठेवा, शिंदे गटाला भाजप एक-एक जागेसाठी रडवणार, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी महायुतीतील जागा वाटप आणि त्यात शिंदेंच्या शिवसेनेची काय अवस्था असेल? यावर भाष्य केले आहे.

निवडणुक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. यावरही दानवे यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो पोस्ट करत महायुतीला इशारा दिला होता. (Shivsena) महाराष्ट्रातील जनतेने फक्त हा फोटो लक्षात ठेवावा, बाकी विजय महाविकास आघाडीचाच होणार, असा दावा दानवे यांनी आपल्या पोस्टमधून केला होता.

त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पुन्हा अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याची संधी हेरली. दानवे यांच्या पोस्टवर शिवसेनेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT