Ambadas Danve at a public event after Maharashtra government withdrew his Y Plus escort security cover. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : फडणवीस सरकारने अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा काढली : आदेश मिळताच पोलिसांकडूनही तातडीने अमंलबजावणी

Ambadas Danve Police Security : अंबादास दानवे यांची वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. गृह विभागाच्या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी केली. सदस्यत्व संपल्यानंतर सुरक्षा पुनरावलोकनानंतर निर्णय झाला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना असलेली 'वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद आणि विधान परिषदेचे सदस्यत्व संपून 4 महिने झाले आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील लेखी आदेश गृह विभागाकडून पोलीसांना मिळाले होते. त्यानंतर तात्काळ ही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षात बसावे लागले. यावेळी अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या कार्यकाळात त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारवर कडाडून हल्ले चढवले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली.

अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला तेव्हा फडणवीस, शिंदे यांनी त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणाची चर्चा तेव्हा चांगलीच रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे हे मुळचे भाजपचेच आहेत असे म्हणत त्यांना पक्षात येण्याची आॅफर दिली होती. तर एकनाथ शिंदे यांनी दानवे यांना आमदार होण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देत आपल्याकडे येण्याची गळ टाकली होती. तेव्हा अंबादास दानवे यांनी मी या सभागृहात पुन्हा दिसेन पण कोणत्या पक्षाकडून हे सांगता येणार नाही? असे म्हणत सस्पेंस वाढवला होता.

दरम्यान, झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्वाधिकार अंबादास दानवे यांनाच दिले होते. नगरपालिका, नगरपंचयात आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण छत्रपती संभाजीनगर झेडपीत मात्र दानवे यांनी 9 सदस्य निवडून आणत पक्षाची ताकद दाखवून दिली. दरम्यानच्या काळात विधानसभा आणि विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहा बाहेर राहून अंबादास दानवे यांनीच ही भूमिका वटवल्याचे अनेकदा दिसून आले होते.

आता मात्र राज्य सरकारच्या गृह विभागाने अंबादास दानवे यांना देण्यात आलेली 'वाय प्लस एस्कॉर्ट' पोलिस सुरक्षा काढून घेतली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी (ता. 20) जारी होताच पोलिस आयुक्तालयाने तात्काळ अंमलबजावणी केली. दानवे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कालावधी चार महिन्यांपूर्वीच संपला असून. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशी व धोका मूल्यांकनातील बदलानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT