Ambadas Danve Attack On CM Fadnavis-Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : आमचं पाणी आंदोलन तुम्हाला बोचलं, पण तीन महिन्यात पाणी देऊ हे आश्वासन कसे विसरलात? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Ambadas Danve On CM Devendra Fadnavis-Sanjay Shirsat : अंबादास दानवे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची आठवण करून देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

  • अंबादास दानवे यांनी संभाजीनगरच्या तीव्र पाणीटंचाईसाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट जबाबदार धरले.

  • पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला.

  • या प्रश्नावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणीही त्यांनी दिली.

Shiv sena UBT News : आगामी महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही अडचणीचा ठरणार आहे. गेली कित्येक वर्ष या विषयाचे राजकारण दोन्ही बाजूंनी झाले. पण संभाजीनगरकरांची तहान काही भागली नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनी त्या त्या वेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण सध्या एकमेकांना करून देण्याची स्पर्धा लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल संभाजीनगर दौऱ्यावर येऊन गेले. या निमित्ताने ते विरोधी पक्षनेते असताना महापालिकेवर काढलेला मोर्चा आणि तीन महिन्यात शहराला पाणी देण्याचे दिलेले आश्वास यावरून अंबादास दानवे यांनी फडणवीसांना डिवचले.

आमचे 'लबाडांनो पाणी द्या' हे आंदोलन काल आपल्याला बोचलं देवेंद्र फडणवीसजी. पण बोले तैसा चाले असं आपलं काम नाही. ऐका, तुमचेच खोटे, तुमचेच शब्द, तुमचेच भाषण आणि तुमचेच व्यासपीठ, असे म्हणत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये शहरातील अविष्कार चौकात केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. अतुल सावे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या जाहीर सभेत 1620 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा उल्लेख करतानाच तीन महिन्यात संभाजीनगरकरांना पाणी देणार, असे ठामपणे सांगितले होते.

अंबादास दानवे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची आठवण करून देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. आज नोव्हेंबर 2025 निम्मा गेला. आपण तेव्हा साफ खोटे बोलून गेलात म्हणून लोकांसाठी आम्ही हे आंदोलन केलं. आणि हो, आम्ही ते बंद केलेलं नाही. पाण्यासाठी परत कधीही क्रांती चौकात बसू. या आंदोलनामुळे तुम्ही किमान या योजनेचा आढावा तरी घेतला होता. नाही तर नागपूरच्या स्कीम्स मधून आपल्याला उसंत कुठे, असा चिमटाही दानवे यांनी आपल्या पोस्टमधून काढला.

गेल्या तेरा महिन्यापासून स्वामी रामानंद तीर्थ यांचा तयार पुतळा अनावरणाच्या प्रतिक्षेत होता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण झाले. यावरूनही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार! तब्बल 13 महिन्यांपासून पासून तयार मात्र झाकलेला स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा अनावरणाच्या प्रतिक्षेत होता, जे आज झाले.

मराठवाड्याला 13 महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले, तेच स्वामीजींच्या या अर्धकृती पुतळ्याबाबत आपण केले! हा योगायोग आहे की स्वामीजींप्रती आपली-सरकारची असलेली अनास्था? असा सवाल दानवे यांनी या निमित्ताने केला. 17 सप्टेंबर 25 रोजी आम्ही पुतळा अनावरणास 15 मिनिटे मागितली. आपण आज चार महिन्यांनी चक्क 20 मिनिटे दिली! व्वा, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

शिरसांटावर निशाणा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपलेही वजन आहे, छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी द्या, चेहरा मोहरा बदलून दाखवतो, असे म्हणणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरही अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. देवाभाऊंच्या भाषणासाठी माईक आणण्यासाठी धावतांनाचा शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल करत 'स्वाभिमान गहाण टाकणे' म्हणजे काय माहिती आहे? हा व्हिडियो पहा, असा टोला दानवे यांनी लगावला! उद्धव साहेबांच्या सभेला पाहुण्यासारखे येणारे फडणवीसांसाठी आज माईक लावायला धावत सुटले आहेत, असा आहे यांचा महाराष्ट्रधर्म अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना डिवचले.

FAQs

1. संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई का वाढली आहे?
शहरातील जलस्रोत कमी होणे, पाईपलाईन गळती व प्रशासनाकडून योग्य नियोजन न होणे यामुळे पाणी संकट गंभीर झाले आहे.

2. अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर नेमकी कोणती टीका केली?
पाणी समस्येकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे उत्तरदायित्वाची मागणी केली.

3. सरकारने यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
(बातमीप्रमाणे) अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जाते.

4. पाणीटंचाई सोडवण्यासाठी कोणती पावले अपेक्षित आहेत?
जुनी पाईपलाईन दुरुस्ती, जलस्रोत वाढवणे, टँकरवरचा अवलंब कमी करणे आणि नियोजनबद्ध पुरवठा व नवी योजना तातडीने कार्यन्वित होणे आवश्यक आहे.

5. स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे?
नागरिक पाणीअभावी त्रस्त असून शासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT