जलील पठाण
Latur News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून बैठका घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात औसा मतदारसंघावरून चुरस असल्याचे दिसत आहे.
दिल्लीहून तिकीट मी आणतो. काका, तुम्ही औसा ते मुंबईचे तिकीट आणा, अशा शब्दांत अमित देशमुखांनी त्यांचे काका दिलीपराव देशमुखांना (Diliprao Deshmukh) साद घातली आहे. सध्या औसा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याबाबत आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) टोकाचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच लातूरमध्ये झालेल्या मांजरा कारखान्याच्या एका कार्यक्रमात अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे तिकिट दिल्लीहून मी आणतो, मात्र या उमेदवाराला विजयी करून मुंबईच्या विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी दिलीपराव देशमुखांनी घ्यावी, अशी गळ त्यांनी घातली. (Amit Deshmukh News)
आता अमित देशमुख कोणाचे तिकीट आणणार या बद्दल इच्छुकांमध्ये कमालीचा सस्पेन्स वाढला आहे. सर्वाधिक संधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांना मानली जात आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षातील मारुती महाराज सरकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले यांची देशमुख परिवाराची जवळीक आहे. त्यासोबतच खास करून दिलीपराव देशमुखांची मर्जी भोसले यांच्यावर दिसत असल्याने व तरुण मराठा चेहरा असल्याने तिकिटात भोसले पण बाजी मारू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
औसा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा कसा आहे? याची उजळणी आमदार अमित देशमुख प्रत्येक कार्यक्रमात करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात औशाची जागा काँगेसकडेच राहिल, असा आग्रह अमित देशमुख करीत आहेत. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांना त्यांच्या नेतृत्वाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याची चर्चा आहे.
एकीकडे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार दिनकर माने झाडून कामाला लागले आहेत. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी एका बाजूने देशमुखांशी जवळीक साधून दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकरांची मर्जी संपादन करीत आहेत.
नव्या दमाचा मराठा चेहरा म्हणून संतोष सोमवंशी यांच्याकडे पाहिले जाते. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या समोर संतोष सोमवंशीचा पर्याय महाविकास आघाडीने वापरला तर शिवसेनेबरोबरच काँग्रेस पाठीमागे राहिली तर सोमवंशी चांगली फाईट देऊ शकतील, असा दावा केला जात आहे.
अमित देशमुखांचे दिल्लीहून तिकीट आणतो म्हणने आणि दिलीपरावांनी त्या उमेदवाराला निवडून देत विधानसभेत पाठवा म्हणने काँगेसच्या इच्छुकांमध्ये गुदगुल्या करणारे आहे? हे मात्र नक्की. तरी शेवटी देशमुखांच्या डोक्यात काय चालले आहे, याचे कोडे कोणालाच उलघडत नाही.
(Edited By : Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.