Kalyan Kale and Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : वडिलांची मैत्री मुलाने जपली, कल्याण काळेंचा अर्ज भरण्यास अमित देशमुख आले!

Jagdish Pansare

Loksabha Electio 2024 : राजकारणात मैत्री, हितसंबंध आणि शत्रुत्वही जपले जाते. राजकारणापलीकडच्या मैत्रीचे नाते नेत्यांची पुढची पिढीही जपताना दिसते आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षात गेली. पण त्यांचे सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते.

राज्यात आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या विलासराव देशमुख यांना ते मराठवाड्याचे असल्याबद्दल एक अभिमान होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसमध्ये तरुणांची एक फळी निर्माण केली होती. प्रत्येक जिल्हा, तालुक्यात त्यांनी तरुणांना प्रोत्साहन देत त्यांना राजकारणात आणलं. त्यापैकीच एक माजी आमदार व छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आता जालना लोकसभा मतदारसंघासाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे(Kalyan Kale) हे देखील आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वडिलांकडून राजकीय वारसा लाभलेले कल्याण काळे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात पुढे आले आणि त्यांची कारकीर्द बहरली. विलासराव देशमुख जेव्हा जेव्हा संभाजीनगरात यायचे तेव्हा तेव्हा कल्याण काळे यांच्या घरचा पाहुणचार घेतल्याशिवाय ते जात नसत. विलासराव देशमुख आणि कल्याण काळे यांच्यातील जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजेच अमित देशमुख(Amit Deshmukh), धीरज देशमुख या भावांनी जपले.

2009 मध्ये विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनीच कल्याण काळे यांना लोकसभा लढण्यास सांगितले होते. केवळ लढायला सांगून ते थांबले नाहीत तर काँग्रेसची संपूर्ण ताकद व यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी केली. परंतु अवघ्या साडेआठ हजार मतांनी काळे यांचा भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याकडून पराभव झाला. आता पंधरा वर्षांनंतर पुन्हा कल्याण काळे सलग पाच वेळा जालना मतदारसंघातून निवडून आलेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

आज काळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्ज भरण्याच्या प्रसंगी अमित देशमुख खास लातूरहून हेलिकाॅप्टरने जालन्यात आले होते. काळे यांनी याचा आपल्या भाषणात खास उल्लेख केला. 2009 मध्ये विलासराव देशमुखांनी मला उमेदवारी देऊन लोकसभा लढण्यास सांगितले. पण माझा थोडक्यात पराभव झाला, आता त्यांचे तेव्हा अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे पुत्र अमित देशमुख आले आहेत, त्यांचे मी आभार मानतो.

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढत आहे. मी जनतेचा उमेदवार आहे, तर विरोधात मोदींचा(PM Modi) उमेदवार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विलासबापू औताडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. कारण मोदींनी पंधरा लाख रुपये खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन जुमला होते हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, असा टोला लगावतानाच आपला विजय निश्चित असल्याचा दावा काळे यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT