Latur crime News : देशभरात शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहराची ओळख लातूर पॅटर्नमुळे आहे. परंतु गेल्या काही वर्षात या शहरांमध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाढवळ्या पडणारे खून, दरोडे, अत्याचार आणि पेपर फुटीसारख्या प्रकारांमुळे बदनाम होत असलेले लातूर शहर याबद्दल चिंता व्यक्त करत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद दिली आहे.
लातूर शहरातील व जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांचा पाढा वाचत अमित देशमुख यांनी लातूर पॅटर्नचा लौकिक कायम राखण्यासाठी साद घातली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असताना शांत, सुरक्षित आणि सामाजिक एकोपा जोपासणारे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात आदर्श असा लातूर पॅटर्न घडवणारे शहर म्हणून संपूर्ण देशभरात लौकिक असलेल्या लातूर शहर आणि जिल्ह्यात दररोज गंभीर स्वरूपातील गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.
शहरातील एका शिक्षण संस्थाचालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरील प्रकार अत्यंत चिंताजनक असून, त्यांसंदर्भाने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
मागच्या काही वर्षात महानगरांप्रमाणेच लातूर सारख्या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात खून, दरोडे, बलात्काराच्या घटना अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. मटका, जुगार, गुटखा व दारू विक्री, अशा अवैध व्यवसायाचे प्रमाणे वाढले आहे. यात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट लातूरसारख्या शहरापर्यंत येऊन पोहोचले आहे.
या संदर्भाने अनेक वेळा तक्रारी निवेदने देऊनही पोलीस विभाग त्याची दखलही घेत नाही. परिणामी गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसात लातूर शहर जिल्ह्यात असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. परळीतील एका व्यावसायिकाचा लातूरमध्ये आणून खून केल्याची घटना ताजी असताना २९ सप्टेंबर रोजी शहरातील ठाकरे चौकात कोयत्याच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
रेना मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला आहे. शहरातील अंबेजोगाई रोडवर असलेल्या चायनीज सेंटर मध्ये येऊन दारुड्याने गोंधळ घातल्याची चित्रफीत सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, नव्याने दाखल झालेल्या पोक्सो गुन्ह्या संदर्भात समाज माध्यमावर अनेक दिवस माहिती व्हायरला होत असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत होते.
एकंदरीत पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहेत, कोयता टोळी दहशत निर्माण करीत आहे. परिणामी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही वाढ होत आहे. ही बाब लातूर शहर आणि जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ बिघडवणारी आहे, येथील शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने त्यांनी यात लक्ष घालून येथील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीला आळा घालावा, गुन्हेगारांना अटक करून त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल या दृष्टीने कारवाई करावी अशी. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करीत आहोत अशी पोस्ट अमित देशमुख यांनी सोशल मीडियावर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.