

Gokul election News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत राजकीय वातावरण तापले असतानाच आता प्रचारपत्रकावरूनही वादाची ठिणगी पडली आहे. गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी काढलेल्या प्रचारपत्रकावरून राष्ट्रवादी काँग्रेससह काही संचालकांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी स्पष्टीकरण देत हे पत्रक महायुतीच्या जागावाटपापूर्वीचे असल्याचे सांगितले. तसेच महादेव जानकरांच्या 200 कोटींच्या आरोपावरही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले.
प्रचारपत्रकावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना शौमिका महाडिक म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीच्या प्रचारपत्रकामुळे काही जणांनी गैरसमज पसरवला आहे. पण ही पत्रके महायुतीच्या पार्श्वभूमीवर छापण्यात आलेली नाहीत. गेल्या पाच वर्षांत आपण काय काम केले, याची माहिती या पत्रकातून देण्यात आली आहे.”
महायुतीचे जागावाटप अवघ्या २ दिवसांपूर्वी निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या नावाने अद्याप कोणतेही पत्रक काढण्यात आलेले नाही. तसेच गोकुळ निवडणुकीत अद्याप चिन्हवाटपही झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीचे अधिकृत पत्रक जनतेसमोर येईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
“हे पत्रक जुने आहे. काही ठिकाणी ही पत्रके आता पोहोचल्यामुळे त्याचा संदर्भ महायुतीशी जोडला जात आहे. विरोधी संचालिका म्हणून मी गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडला आहे. या पाच वर्षांतील संघर्ष सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. प्रत्येक उमेदवाराप्रमाणे मीही माझे काम जनतेसमोर ठेवले आहे. याचा अर्थ मी महायुतीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करत आहे, असा होत नाही,” असे त्या म्हणाल्या.
आपण ज्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला, त्या जनतेसमोर मांडत असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. काही जण जाणूनबुजून गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. “महायुतीचे नेते परिपक्व राजकारणी आहेत. ते ही गोष्ट समजून घेतील. ज्यावेळी आम्ही महायुती म्हणून जनतेत जाऊ, त्यावेळी ताकदीने लढू,” असेही त्या म्हणाल्या.
महायुतीच्या जागावाटपावरही शौमिका महाडिक यांनी भाष्य केले. “जागावाटपावर सर्वजण समाधानी आहेत. कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यामागे काही कारणे असतील. आम्हाला ज्या जागा मिळाल्या आहेत, त्यात आम्ही समाधानी आहोत,” असे त्यांनी सांगितले.
मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, “मुश्रीफसाहेब का नाराज आहेत, याची मला कल्पना नाही. सध्या अनेक निवडणुका एकाच वेळी आल्या आहेत. त्यांचे काही संदर्भ असू शकतात,” असे महाडिक म्हणाल्या.
गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेवरही शौमिका महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली. “बिनविरोधचा कोणताही प्रस्ताव नाही. मी केवळ लोकांच्या भावना मांडल्या होत्या. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर असा कोणताही प्रस्ताव नाही. नेत्यांनी निर्णय घेतला तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते; पण आता आमच्या हातात काहीही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळला मल्टिस्टेट करण्यासाठी आपल्याला 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून सध्या गोकुळच्या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपावर शौमिका महाडिक यांनी जानकरांना थेट सवाल केला.
“जानकरसाहेबांबद्दल मी बोलणे उचित नाही. ते मंत्री होते आणि त्यांच्याकडे अधिकार होते. मग त्याचवेळी त्यांनी याची दखल घेऊन कारवाई करायला हवी होती. दहा वर्षांनंतर त्यांना साक्षात्कार का झाला? जर मंत्री असताना त्यांना ऑफर दिली होती, तर त्यावेळी कारवाई करणे अपेक्षित होते. दहा वर्षे ते का गप्प होते? अचानक गोकुळचा कळवळा का आला?” असा सवाल महाडिक यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.