MLA Amit Deshmukh addressing the DPDC meeting in Latur, raising concerns over low fund utilization and urging immediate action on pending development projects. Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh : डीपीडीसीचा फक्त चाळीस टक्के निधी खर्च, अमित देशमुख नाराज!

Latur DPDC Meeting : लातूर डीपीडीसी बैठकीत फक्त 40 टक्के निधी खर्च झाल्याबद्दल अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. रखडलेल्या विकास कामांना गती, निधी पारदर्शकता आणि पायाभूत सुविधांसाठी त्वरित निधीची मागणी केली.

Jagdish Pansare

Latur DPDC Meeting News : लातूर जिल्ह्यासाठी नियोजन समितीतून मंजूर असलेल्या निधी पैकी आतापर्यंत फक्त 40 टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे. ही बाब गंभीर असल्याचे सांगत अमित देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही बाब गंभीर असून, कामाला गती देऊन उर्वरित निधीचा तातडीने विनियोग करावा. एकूण निधी वाटपात आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवून दर्जेदार कामे करावीत. जिल्ह्यात निधीअभावी रखडलेल्या योजनांना निधीचा पुरवठा करून कामांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली.

नगरपालिका, नगर पंचायत, महापालिका आणि लगेच लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकींमुळे जिल्हा नियोजन समितीची लांबलेली बैठक लातूरमध्ये आज घेण्यात आली. मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ चाळीस टक्के एवढाच निधी खर्च झाल्याने याबद्दल बैठकीत लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांनी बैठकीत या संदर्भात रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी करत काही विषयांकडे लक्ष वेधले.

लातूर येथे उभारावयाचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व 80 फुट उंचीच्या पुतळ्यासाठी निधीची उपलब्धता, लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाला मंजुरी देण्याची मागणी देशमुख यांनी बैठकीत केली. माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी लातूर येथे उभारावयाच्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मारकासंबंधी घोषणा केली होती, त्यानूसार स्मारक उभारणीला निधी मंजूर करून गती द्यावी, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

लातूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, नवीन बाह्यवळण रस्त्याला यापूर्वीच मंजुरी दिलेली असून, या रस्त्यासाठी 80 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. उर्वरित 20 टक्के जमीन संपादनासाठी या महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर रेल्वेस्टेशन आणि विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने जमीन संपादनासाठीही या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा.

अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकात्मिक कार्यक्रमाची आखणी करून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अनेक विकास योजना तसेच जलजीवन मिशनच्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत, या कामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

विमानतळ हस्तांतरित करा

बारामती येथे झालेल्या विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता लातूर विमानतळही 'एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे' हस्तांतरित करण्याची मागणीही अमित देशमुख यांनी बैठकीत केली. विविध प्रकल्प तसेच शासकीय योजनांसाठी निधी, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आदी मागण्यांचे निवेदनेही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे यावेळी देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT