Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah Tour News : मोठी बातमी! अमित शाह यांचा दुसऱ्यांदा संभाजीनगर दौरा रद्द, काय आहे कारण?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा दुसऱ्यांदा रद्द झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ शाह यांच्या हस्ते संभाजीनगरातील जाहीर सभेतून फोडण्यात येणार होता. परंतु आता त्यांचा दौरा आणि सभा रद्द करण्यात आली आहे. तीन राज्यातील शेतकऱ्यांनी चल्लो दिल्लीचा नारा देत कूच केल्यामुळे अमित शाह यांचा 15 फेब्रुवारी रोजीचा छत्रपती संभाजीनगर दौरा व सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेते अमित शाह यांचा हा संभाजीनगर दौरा दुसऱ्यांदा रद्द झाला आहे. यापूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 17 सप्टेंबर 2023 च्या विशेष कार्यक्रमासाठी अमित शाह संभाजीनगरात येणार होते. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि भाजपनेही जय्यत तयारी केली होती. या कार्यक्रमावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, अचानक अमित शाह यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता. यावेळचा दौरा हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा समजला जात होता. शाह यांचा दौरा तडकाफडकी रद्द होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा तीन लोकसभा मतदारसंघाचा मिळून तयार करण्यात आलेल्या क्लस्टरसाठीची अमित शाह यांची एकत्रित सभा 15 रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्याचा प्रवेशही मोठ्या कार्यक्रमातून करण्यासाठी 15 रोजी शाह यांच्या संभाजीनगरच्या सभेचाच मुहूर्त होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु, अमित शाह यांचा हा पुर्वनियोजित दौरा रद्द झाल्यानेच अशोक चव्हाण यांचा आज मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयातील छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश उरकण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा दुसऱ्यांदा संभाजीनगर दौरा रद्द झाल्याने भाजपच्या नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, राज्याचे गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी सभेची जय्यत तयारी सुरू केली होती. या सभेला एक लाख लोक जमवून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा भाजपचा प्रयत्न होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT