मराठवाडा

Amol Kolhe - Raosaheb Danve : खासदार अमोल कोल्हे- दानवे यांची भेट; काय झाली असेल चर्चा ?

Amol Kolhe - Raosaheb Danve : कोल्हे आणि दानवे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe - Raosaheb Danve : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच मागील काही दिवसांत कोल्हे यांची भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी जवळीक वाढली असल्याचं देखील बोललं जात आहे. आता याचदरम्यान,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची जालन्यात भेट झाली. यावेळी दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा देखील झाली असल्याची माहिती समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जालना येथे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्याहस्ते मंत्री व खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दानवे व कोल्हे यांच्यात 25 मिनिटं कारमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथे २३ ते २८ दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य होणार आहे. याचं निमंत्रण देण्यासाठी अमोल कोल्हेंनी ही भेट घेतल्याची शक्यता आहे. पण उभा भेटीत काही राजकीय चर्चा झाली का याबाबत दोन्ही नेत्यांनी गुप्तता पाळली आहे. मात्र, या भेटीमुळे पुन्हा एकदा कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरु लागली आहे.

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. पण गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार डाॅ. कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं होतं. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरातही गैरहजर होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानाविरोधात छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रूक येथील समाधीस्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मौन धरून आत्मक्लेश आंदोलन केले होते. त्यालाही खासदार आणि शिवराय आणि संभाजीप्रेमी कोल्हे गैरहजर राहिल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती.

यावरून अमोल कोल्हे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर देखील रंगलेलं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे अमोल कोल्हे नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात पसरली होती तसेच अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आलबेल नसल्याची देखील चर्चा होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी कोल्हे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना रुचली नव्हती. तर भाजपकडून मात्र शाह- कोल्हे भेटीचं स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे खासदार कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र, कोल्हे यांनी भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला होता.

'' वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे ठरवतो...''

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता याच चर्चांवर कोल्हे यांनी आपली रोखठोक भाष्य केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकांना अजून खूप वेळ आहे. आम्ही शेतकर्यांची पोरं आहोत. आणि शेतकर्यांच्या जातीचं एक वैशिष्टयं आहे. आम्ही ऊगाच औत खांद्यावर घेऊन कधी हिंडत नाही. तर वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे ठरवतो अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजकीय दिशा स्पष्ट केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT