Manoj Jarange Patil Vs Lalita Tarakh Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Vs Lalita Tarakh : अंतरवालीतूनच जरांगेंविरोधात आवाज; समर्थकांकडून येणाऱ्या धमक्या, ट्रोलिंगविरोधात ललिता तारख यांची पोलिसात तक्रार

Antarwali Sarati protester Lalita Tarakh raises serious allegations against Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनातील माजी सहकारी ललिता तारख यांचा दावा; गावाला दिलेल्या आश्वासनांपासून महिलांच्या सहभागापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित, जरांगे म्हणाले, आरोपांवर काही बोलणार नाही.

Jagdish Pansare

Jarange Patil controversy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील आपले हे शेवटचे व निर्णायक आंदोलन असल्याचे जाहीर करत तेथील मंडप काढून टाकण्याचे आदेश दिले. शिवाय सरकारला दिलेली तीन महिन्याची मुदत संपल्यानंतर पुढील आंदोलन हे पाटोद्याहून मुंबईकडे असे राहील, याचीही घोषणा केली.

जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर अंतरवाली सराटीतील महिलांकडून त्यांच्यावर आरोप आणि टीका सुरू झाली आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनात सहभागी असलेल्या आणि उपोषण सोडताना जरांगे पाटील यांना पाणी पाजणाऱ्या महिला आंदोलक ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोप केले आहेत.

यावरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठू लागली आहे. आपल्याला धमक्या आणि सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केले जात असून आपल्या जीवाला जरांगे समर्थकांकडून धोका असल्याची लेखी तक्रार ललिता तारख यांनी अंबड पोलिसांत केली आहे. यावर पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसली, तरी या वादाने आता नवे वळण घेतल्याचे बोलले जात आहे.

पाटोदा येथे आंदोलन स्थगित करत सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, जरांगे यांच्याविरोधात अनेक आरोप, पत्रका परिषद आणि सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. जरांगे यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई, ईडीच्या नोटीसा पाठवल्या जात असल्याची चर्चा आहे.

एवढेच नाही, तर ज्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा देशभरात पोहचवला, त्या गावातूनच त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. अंतरवाली सराटी येथील महिला आंदोलक ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला.

हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे आश्वासन जरांगे यांनी अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांना दिले; मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचे तारख यांचे म्हणणे आहे. आंदोलन करूनही अंतरवाली सराटी गावातील एकाही व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. हैदराबाद गॅझेटच्या आधारे अर्ज करून सुमारे दहा महिने झाले तरी अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगीतले.

महिलांचा भावनिक वापर

जरांगे यांनी महिलांना भावनिक करून आंदोलनात त्यांचा वापर केल्याचा गंभीर आरोप तारख यांनी केला आहे. अंतरवाली सराटीसह 123 गावांचा आंदोलनासाठी वापर करून घेतला. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केले हे वेळ आल्यावर सांगेन, असा इशाराही सोशल मिडियाच्या माध्यमातून ललिता तारख यांनी दिला आहे.

महिला म्हणते, जीवाला धोका

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यापासून आपल्याला धमक्या येत आहेत. जरांगे पाटील यांचे समर्थक सोशल मीडियातून ट्रोल करत आहेत. या समर्थकांकडून माझ्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार ललिता तारख यांनी अंबड पोलीसांत दिली आहे. एवढे दिवस मी त्यांच्या बाजूने बोलत होते तर त्यांच्यासाठी चांगले होते,आज सत्य बोलले तर, समजून घ्या. तुम्ही कमेंट करत आहात, तुमच्या घरी आई बहीण आहे, याचं भान ठेवा.

सुनेत्रा पवारांकडे कारवाईची मागणी

पोलिसांनी याप्रकरणात तात्काळ कारवाई करावी. माझी सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, याची सखोल चौकशी करावी. सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मी पैसे घेतले, मला किती लाखांचे पॅकेज आले, तुम्ही प्लॉट घेतला का, असे अनेकजण विचारत आहेत.

जरांगेंनी प्रतिक्रिया देणे टाळले

2023 पासून माझ्या आणि यांच्या संपत्तीची चौकशी करा, तुम्हाला सगळं कळेल. कोणाच्या संपत्तीत वाढ झाली, हे दिसेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन, तुम्ही अजूनही भान ठेवून बोला, मला बोलायला लावू नका, असा इशारा ललिता तारख यांनी दिला. तारख यांच्या आरोपांवर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कोणतेही भाष्य करणार नसल्याचे काल स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT