Sujay Vikhe Patil : ‘काल थोरातांसोबत जेवण करून आलोय’; सुजय विखेंच्या विधानाने अहिल्यानगरच्या राजकारणात नवी चर्चा

Sujay Vikhe remarks fuel fresh discussion over Thorat-Vikhe talks and the Ahilyanagar District Bank election : जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थोरात-विखे जवळीक; ‘शेतकरी महत्त्वाचा’ म्हणत सुजय विखेंनी मांडली भूमिका, राम शिंदे-नीलेश लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे.

"राजकारणात इतका भयानक बदल झाला आहे की, त्याचे विश्लेषण करणेही कठीण झाले आहे. आपल्याला वाटते की आपण गुप्त बैठका घेतो; मात्र आता कोणतीही बैठक गुप्त राहत नाही. मी काल दुपारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत जेवण करून आलो आहे. आता सांगा, काय करायचे?" असे सुजय विखे पाटील म्हणाले.

त्यांच्या या विधानामुळे थोरात-विखे पाटील यांच्यातील बैठकीचा जिल्हा बँक (DCC Bank) निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकांकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांमध्ये थोरात-विखे पाटील यांच्यातील चर्चेला किती महत्त्व मिळते आणि त्याचा इतर राजकीय गटांच्या भूमिकेवर काय परिणाम होतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Sujay Vikhe Patil
Ahilyanagar DCC Bank Election : थोरात-विखे एकाच मंचावर; राम शिंदे, नीलेश लंके गैरहजर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुढे काय?

स्वाभिमानापेक्षा शेतकरी महत्त्वाचा

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेत चुकीचे लोक जाऊ नयेत, यासाठी मी स्वाभिमान बाजूला ठेवला आहे. माझ्या स्वाभिमानापेक्षाही शेतकरी जगला पाहिजे, ही माझी भावना आहे. त्यासाठी कोणाच्याही दारात जायला तयार आहे. त्याचा कमीपणा वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेची निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. जागावाटप आणि विविध राजकीय गटांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आव्हान या प्रक्रियेत आहे.

Sujay Vikhe Patil
Ahilyanagar District Bank Election : बाळासाहेब थोरातांकडे जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधची चावी? फिरवणार कशी, ते स्पष्टचं सांगितले...

होकार दिला तर काम पूर्ण करतो

आपल्या कार्यपद्धतीबाबत बोलताना सुजय विखे पाटील यांनी थेट भूमिका मांडली. तुम्हाला खरे बोलायचे असेल, तर कडू व्हावे लागते. जे सत्य आहे, ते लोकांना सांगितले गेले पाहिजे. करू, पाहू, उद्या या, परवा या, असे सांगणे मला अजिबात जमत नाही. माझ्याकडे एखाद्या कामासाठी आल्यानंतर एकदा होकार दिला, तर ते काम पूर्ण करतो. मात्र, नकार दिला तर ते काम महाराष्ट्रात दुसरे कोणी करू शकत नाही, हेही सांगतो, असे विखे पाटील म्हणाले. लोकांना झुलवत ठेवण्याचा प्रकार मला जमत नाही. जे शक्य आहे, त्यालाच मी होकार देतो आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही," असेही त्यांनी सांगितले.

सबस्टेशनबाबत विखे पाटलांचा शब्द

दरम्यान, नांदूर येथील वीज सबस्टेशनच्या कामाबाबतही सुजय विखे पाटील यांनी आश्वासन दिले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या वतीने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. तुमचे सबस्टेशन एका वर्षात पूर्ण होईल, हा शब्द देतो, असे विखे पाटील यांनी म्हटले. गावाच्या विकासाबरोबरच मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा तसेच पोलिस भरतीमध्ये निवड झालेल्या संगमनेरमधील विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आणि प्रमोद राहाणे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com