नवनाथ इधाटे
Chh. Sambhajinagar News: फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आमचे नेते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेनाना यांनी एका कुटुंबाप्रमाणे जपला आहे. पक्षाने मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवल्याने निश्चितच जबाबदारी वाढली आहे.
विरोधकांचे आव्हान म्हणाल, तर तसे काहीच नाही. माझे विरोधक हे राजकराणात कधीही यश न मिळालेले आहेत, तर मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून सातत्याने यश मिळवत आले आहे.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुठलाही अनुभव नसताना माझ्यासारख्या नवख्या महिला उमेदवाराला मतदारांनी भरभरून मतदान दिले. (Haribhau Bagde) माझा विजय तेव्हा झाला नसला तरी आता तो निश्चित होईल, असा विश्वास विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केला.
सकाळच्या `थेट भेट` भेट कार्यक्रमात त्यांनी मतदारसंघातील देवगिरी सहकारी साखर कारखाना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच महिला सुरक्षा, प्राथमिक शिक्षण यावर आपले विशेष लक्ष असेल असे स्पष्ट केले.
जलसंधारण, मका प्रक्रिया उद्योग यांसारख्या कामांना प्राधान्य देत मतदारसंघातील तरुणांच्या हाताला रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याचा आपला प्रयत्न असेल. मतदारसंघात जलसंधारणाची कामे छोट्या स्वरुपात झाली आता विधानसभेच्या माध्यमातून ती मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यातून प्रत्येक गावाला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याचा स्रोत निर्माण होईल. फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो.
तो सुरू व्हायला हवा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, त्यासाठी मी प्रयत्नही करणार आहे. पण गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे जेव्हा इथे काँग्रेसचे आमदार होते तेव्हापासून हा कारखाना बंद आहे. निश्चितच तो आम्ही सुरू करू आणि या भागातील शेतकऱ्यांना दिलास देऊ, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. (BJP) लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला मराठवाड्यात व राज्यात फटका बसला, पण विधानसभेला ती परिस्थिती राहिलेली नाही, ती बदललली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महिला भगिनींमध्ये मोठा उत्साह आहे, त्याचा निश्चितच फायदा महायुतीला राज्यभरात होईल. फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पात पाण्याचा साठा कमी येत असल्याने नदीजोड प्रकल्पाद्वारे बंद नलिकेद्वारे नदीमधील वाहणारे पाणी या प्रकल्पात वळविण्यात आले आहे. त्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी माजी आमदार आमचे नेते हरिभाऊ बागडे यांनी शंभर कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
बाजार समिती नफ्यात आणली..
यात शेतकऱ्यांना आपल्या शेतात दोन पिके हमखास घेता येणार आहेत. याशिवाय मका आणि कपाशी या दोन पिकांची प्रामुख्याने शेतकरी लागवड करीत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मकावर प्रक्रिया करणारा उद्योग लवकरच उभारला जाणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्तावही बाजार समितीच्या माध्यमातून दाखल केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
फुलंब्री येथील तोट्यात असलेली बाजार समिती आम्ही एका वर्षभरातच नफ्यात आणली आहे. 74 लाखांचा व्यवहार करीत 34 लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. त्यामुळे काटकसर, व्यवस्थितपणा आणि हिशेब ठेवण्यात महिला कुठेही कमी नाही, असे अनुराधा चव्हाण यांनी सांगत आपल्या सभापती पदाच्या काळातील लेखाजोखा मांडला.
मला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सहाजिकच मतदारसंघातील आमच्या पक्षातील इच्छुक नाराज झाले होते. पण आमचा पक्ष एक कुटुंब आहे, कुटुंबातील भांडणे जशी औटघटकेची असतात, तशीच माझ्या भावांची नाराजी होती. ती आता दूर झाली असून ते सगळे प्रचाराला लागले आहेत, असेही अनुराधा चव्हाण म्हणाल्या. माझ्या विरोधक उमेदवाराला जनतेने तीन निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीतही होईल, असा दावा चव्हाण यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.