
Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सध्या जोरात सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील असले तरी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षात रस्सीखेच पहावयास मिळत आहे. सोमवारी भाजपने तिसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये चार महिलाना संधी दिली आहे.
भाजपने (BJP) सोमवारी दुपारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 25 नावाचा समावेश आहे. पहिल्या यादीत 99 तर दुसऱ्या यादीत 22 तर तिसऱ्या यादीत 25 अशा एकूण 146 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेषतः या यादीत चार महिलांना संधी देण्यात आली आहे.
सॊमवारी घोषित करण्यात आलेल्या या यादीत लातूर शहर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून भारती लव्हेकर, वसईतून स्नेहा दुबे, विदर्भातील कारंजा मतदारसंघातून सई डहाके यांना उमेदवारी दिली आहे.
त्याशिवाय आर्वी मतदारसंघातून विद्यमान उमेदवारांची उमेदवारी कापून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माजी स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.
माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजप पुन्हा संधी देणार की नाही याची चर्चा होती. पहिल्या दोन यादीमध्ये सातपुते यांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये माळशिरसमधून पुन्हा राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर यांची लढत माजी मंत्री व कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांच्याशी होणार आहे तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आहेत. ते अजित पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने या जागी आपला उमेदवार घोषित करत सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.