Dharashiv Lok Sabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha 2024 News : धाराशिव मतदारसंघात एका आमदारासह दोघांचे अर्ज बाद; कोण घेणार माघार ?

Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात सर्व घडामोडी घडल्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी करताना शनिवारी एका विद्यमान आमदारासह दोन जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने चर्चा रंगली आहे.

Sachin Waghmare

Dharashiv News : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून धाराशिव मतदारसंघ या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुरुवातीला महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटणार यावरून सस्पेन्स होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार यावरून ट्विस्ट पहावयास मिळाले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य पाहवयास मिळाले. आता या सर्व घडामोडी घडल्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी करताना शनिवारी एका विद्यमान आमदारासह दोन जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मोठी चर्चा रंगली आहे.

धाराशिव लोकसभा (Dharashiv Loksabha) मतदारसंघातील शनिवारी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andahlkar) आणि एमआयएमचे सिद्दीक बौडीवाले यांच्या उमेदवारी अर्जावरही हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र त्या हरकती फेटाळण्यात आल्याने त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. दुसरीकडे यावेळी एका आमदासह दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले. (Dharashiv Lok sabha 2024 News)

34 उमेदवार निवडणूक मैदानात

दरम्यान 36 उमेदवारांपैकी दोन अपक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आता 34 उमेदवार निवडणूक मैदानात शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे.

त्याशिवाय अपक्ष उमेदवार वर्षा कांबळे या आणखी एक अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला. धाराशिव मतदारसंघातून सध्या 34 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

निवडणूक रिंगणातून कोण माघार घेणार

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचे विवरण चुकीचे दिल्याचे सांगत विरोधी उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता. तर एआयएमआयएम पक्षाचे सिद्दीक शेख यांच्या अर्जातील नाव चुकीचे असल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे दोन्ही आक्षेप फेटाळून लावले. सोमवारी (ता. 22) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची तारीख आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातून कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली आहे.

SCROLL FOR NEXT