Ladaki Bahine Yojana News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेत सपाटून मार खाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने महिलासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. शिवराजसिंह चव्हाण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना 'लाडली बहन' नावाने ही योजना लागू केली होती. त्याचा निवडणुकीत त्यांना मोठा फायदा झाला. आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महिलांना भूरळ घालत आहे.
सत्ताधारी पक्षाच्या मंत्री, आमदारासह येणाऱ्या निवडणुकीत इच्छूक असणाऱ्यांनी या योजनेच्या नोंदणीसाठी जोर लावल्याचे चित्र आहे. या योजनेवर विरोधकांनी सत्ताधारी महायुती वर टिकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जालन्याचे शिवसेना नेते अर्जून खोतकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बरीच खळबळ उडाली होती.
या व्हिडिओमध्ये अर्जून खोतकर शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदार यादी घेऊन लाडकी बहीण योजनेसाठी अधिकाधिक महिलांची नोंदणी करण्याचे आवाहन करत होते. हे करत असतांना पाहिजे, तर नाटंक करा, अर्ज भरून घेण्याचे असेही ते या व्हिडिओमध्ये म्हटल्याचे समोर आले होते. यावरून विरोधी पक्षाने खोतकर आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवला होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात याचा जाहीर उल्लेख करत लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे, यामुळे घराघरात भांडण होऊन कुटुंब फुटतील, अशा शब्दात टीका केली होती. खोतकर यांच्या या कथित व्हिडिओमुळे त्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र याकडे फारसे लक्ष न देता किंवा टिका करणाऱ्यांना उत्तर देण्याचे टाळत खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघात या योजनेसाठी नोंदणी करून घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पासून तळागाळातील एक ही महिला वंचित राहू नये, या करिता शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन अर्जून खोतकर करताना दिसत आहेत. नाटकं करा ते अहोरात्र मेहनत घ्या या त्यांच्या आवाहनामुळे पुन्हा एकदा त्यांच्या व्हायरल व्हिडिओची चर्चा होत आहे. जालना शहरातील नवीन वसाहत भागात महिलांसाठी नोंदणी व्यवस्था शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने महिलांना प्रवासात सवलत, कुसूम योजनेअंतर्गत सौर पंप, मुलींना मोफत शिक्षण,महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी कल्याणकारी योजना आखल्या असून अर्थसंकल्पात शेतीपंपांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. महिलांनी शिक्षणाप्रती अधिक जागृत राहावे, असे आवाहन अर्जुन खोतकर यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.