Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची मते सगळ्यांना मिळाली. कोणत्याही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिलेला नसतानाही हे घडले. आमचा एकमेव मुस्लिम उमेदवार होता, पण त्यालाही पाडले.
खरेतर मुस्लिमांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांनी मराठा समाजाची एकजूट करत मराठवाड्यात आठ खासदार निवडून आणले, असे गौरवोद्गार एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसे यांनी काढले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ओवैसी शनिवारी शहरात आले होते. त्याचवेळी शहरात मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचे होती. मराठवाड्यात सुरू केलेल्या शांतता रॅलीचा आज संभाजीनगरात समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ओवैसी यांनी देशातील विविध राजकीय घडामोडी, मराठा, मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका मांडली.
ओवैसींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. तसेच मनोज जरांगेंचा Manoj Jarange आदर करत असल्याचेही विधान केले. ते म्हणाले, इम्तियाज जलील लोकसभेत नसल्याचे दुःख आहेच. आता असे का घडले? याचा विचार मुस्लिमांनी केला पाहिजे, असे आवाहन करत ओवैसींनी जरांगेशी चर्चा करण्यासही तयारी दाखवली आहे.
इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel यांचा झालेला पराभव ओवैसी यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. मुस्लिमांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकावे, असे म्हणत त्यांनी मुस्लिम मतदार यावेळी विखुरला गेल्याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याचे ओवैसी यांनी सांगितले. कुठे निवडणूक लढवू शकतो, कुठे कोणता उमेदवार देता येईल, याबाबत चाचपणीही यावेळी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकाही राजकीय पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नाही. प्रत्येक पक्षाला फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत. लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवारांमध्ये मुस्लिम आणि दलित समाजच्या मतांचा मोठा सहभाग आहे. एमआयएम पक्षाला वेगळ्या नजरेतून पाहिले जाते. तरी आमच्याकडे वेगवेगळ्या जातीचे लोक जोडले जात आहेत. मी मनोज जरांगे यांची इज्जत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो, असेही ओवैसींनी म्हटले..
जरांगे पाटील यांच्यामुळे 8 खासदार निवडून आले आहेत. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समजाचे उमेदवार जिंकतात, पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात राग असल्याचे ओवैसी म्हणाले. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख आहे. मुस्लिमांनी सर्वांना मतदान केले, मग आम्हाला का मतदान करत नाहीत. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे, असे आवाहन ओवैसींनी Asaduddhin Owaisi केले.
मनोज जरांगेंचे कौतुक
मनोज जरांगे यांना भेटायला जाणार का? असा प्रश्न करताच, त्यांचा प्रस्ताव आला, तर पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करेल, असा चिमटाही ओवैसींनी काढला. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मराठा समाज एकजुटीच्या जोरावर विजय मिळवत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही? याचे शल्य महाराष्ट्रातील 11 टक्के मुस्लिमांना असल्याचेही ओवैसींनी सांगितले.
मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहेत. मोदी म्हणतात मी बॅकवर्डचा नेता आहे. मग त्यांनी लोकसभेत आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात बील आणावे, असे आव्हान ओवैसी यांनी दिले. महाराष्ट्रात आम्ही एक मुस्लिम उमेदवार दिला होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं. आम्ही सर्वांना मत दिले पण आमचा उमेदवार पाडला, असा थेट आरोप ओवेसी यांनी केला.
लाडकी बहीण योजनेच्या Ladki Bahin Yojana अनुदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश महाजन यांनी मुस्लिम महिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते. यावर ओवैसींनी, तो वेडा आहे, अशी टीका करून जास्त बोलणे टाळले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून 10 मुस्लिम लोकांचे मॉबलिंचिंग झाले आहेत. आज सर्वात संकटात मुस्लिम लोक आहेत, असेही ओवैसी म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.