Nanded Politics : गेल्या काही वर्षात भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. विरोधकांना शक्तीहीन करण्याच्या उद्देशाने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विशेषत: काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील बड्या नेत्यांना भाजपने गळाला लावले. पक्ष वाढीसाठी हे करावेच लागते, असं म्हणत भाजपने अख्खे पक्षच फोडले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन काँग्रेसमधील बडे नेते असलेल्या अशोक चव्हाण यांना पक्षात प्रवेश दिला. लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडी मधील सर्व महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावत ऐनवेळी भाजपचे कमळ हाती घेणाऱ्या अशोक चव्हाण यांना सहाजिकच भाजपने रेड कार्पेट अंथरले.
राज्यसभेवर तात्काळ उमेदवारी, विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून मुलगी श्रीजया हिला उमेदवारी आणि नांदेड जिल्ह्यात भाजपची धुरा अशोक चव्हाण यांच्या हाती देत पक्ष नेतृत्वाने निष्ठावंतांना डावल्याचा आरोप होत होता. अशातच राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांसाठी नांदेड स्थानिक स्वराज्य मतदार संघातून भाजपने अशोक चव्हाण यांचे खांदे समर्थक आणि सावली म्हणून वावरणाऱ्या अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी जाहीर करत नांदेड जिल्ह्यात भाजपच्या प्रत्येक निर्णयात आता अशोक चव्हाण यांचीच मर्जी चालेल हे अधोरेखित केले.
निष्ठावंतांनी कितीही खळखळाट केला तरी राजकीय समीकरण आणि पक्षाची ताकद वाढवण्याच्या नावाखाली त्यांना डावलण्याचे प्रकार सुरू आहेत. काँग्रेसमध्ये असताना ज्याप्रमाणे अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व होते त्याला भाजप प्रवेशानंतरही धक्का लागणार नाही याची काळजी भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते घेत असल्याचे दिसून आले आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेत जिथे कित्येक वर्ष भाजपचे कमळ फुलले नव्हते अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा पक्ष आता जिल्ह्यात नंबर एकचा ठरला आहे. अर्थात त्यात अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्हा भाजपमय करताना स्थानिक आणि वर्षानुवर्ष पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या अनेकांच्या निष्ठा पायदळी तुडवलं गेलं.
मात्र याचे सोयरसुतक कुणालाही नाही. अमरनाथ राजूरकर यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीने जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचाच शब्द यापुढे प्रमाण मानला जाईल यावर राज्यातील नेतृत्वानेही शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. महायुतीने नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अशोक चव्हाणांचे समर्थक अमरनाथ राजुरकर यांना उमेदवारी दिली आहे. ही निवड नांदेडच्या राजकारणात मोठे समीकरण बदलणारी ठरू शकते.
अमरनाथ राजुरकर अशोक चव्हाण यांची सावली, खंदे समर्थक आणि अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात. भाजप नांदेड शहर प्रमुख म्हणून 13 मे 2025 ला त्यांची नियुक्ती झाली होती. ही नियुक्ती चव्हाणांच्या खेळीने शक्य झाली होती. त्यामुळे शहरावर चव्हाणांचाच वचक राहिला आहे. विधानपरिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अशोक चव्हाण यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून राजूरकर यांच्या नावावर मोहर उठवून घेतली.
अशोक चव्हाण यांची भाजपमधील पकड मजबूत या उमेदवारीतून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. चव्हाण 2024 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. त्यांना भाजपने राज्यसभेची संधी दिली. आता त्यांच्या समर्थकाला उमेदवारी देऊन भाजपने आयात नेत्याला सन्मान देण्याचा संदेश दिला आहे. याचा अर्थ: चव्हाणांचा नांदेडवरील प्रभाव भाजपने मान्य केला.
भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून "आयात केलेल्या कार्यकर्त्याला" संधी दिली जात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढू शकते. शिवाय भाजप यापुढे निष्ठावंत की चव्हाण समर्थक यापैकी कोणाला प्राधान्य देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशोक चव्हाण यांचे संपूर्ण राजकीय जाळे नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात वापरले जाणार आहे. त्यांच्या काळातील काँग्रेसचे कार्यकर्ते आता भाजपच्या छत्राखाली आल्याने मविआला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
नांदेडची जागा भाजपने राखून ठेवून चव्हाण गटाला दिली, याचा अर्थ शिंदे गट,अजित पवार गटाला नांदेडमध्ये तडजोड करावी लागली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा नांदेडमध्ये नुकताच शिवसंवाद दौरा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आणि अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिंदे यांची मध्यरात्री हॉटेलमध्ये जाऊन गुप्त भेट घेतली होती या भेटीत अशोक चव्हाण यांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या दृष्टीने झाल्याचे बोलले गेले.
प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज घेतला होता. ते इच्छुक असल्याने शिंदे आणि चिखलीकर यांच्या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात होते. मात्र पक्षाचा आदेश आम्हाला मान्य असेल असे सांगत चिखलीकर यांनी सावध भूमिका घेतली होती. आता महायुतीकडून अमरनाथ राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे चिखलीकर आपली तलवार म्यान करतात की मग पडद्यामागून काही हालचाली? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी कसपटा समान लेखत सत्तेतून बाहेर ठेवले. नांदेड शहरामध्ये आपल्या सोयीसाठी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना हाताशी धरत शिवसेनेमध्येच अंतर्गत फूट पाडण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न त्यावेळी यशस्वी झाला होता. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या अपमानाचा बदला घेण्याची संधी चालून आली असली तरी राज्यात असलेल्या महायुतीमुळे नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांचे वाढते वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेला निमुटपणे सहन करावे लागणार आहे.
अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये खदखद आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ती बाहेर येऊ शकते. मात्र पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढण्याचा अशोक चव्हाण यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता निष्ठावंतांची लढाई किंवा प्रयत्न कितपत यशस्वी होतील? हे आज सांगता येणार नाही. उलट अशोक चव्हाण यांना पक्षाकडून बळ दिले जात असल्यामुळे त्यांच्या समर्थकांना आगामी जिल्हा परिषदेत अधिक वाटा मिळण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यात आपला शब्द अंतिम असेल याची काळजी घेतली तशीच ती भाजपमध्येही ते घेताना दिसत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच वेळी आपल्या समर्थकांना पक्षात आणण्याची घाई अशोक चव्हाण यांनी केली नाही. नगरपालिका नगरपंचायत महापालिका अशा टप्प्याटप्प्याने त्यांनी काँग्रेसला पोखरत आपल्या समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश दिला.
यातून त्यांनी भाजपच्या राज्य व केंद्रातील नेत्यांना प्रभावित केले आणि प्रत्येक निवडणुकीत आपलाच शब्द कसा झेलला जाईल अशी रणनीती आखली आणि ती यशस्वी करून दाखवली. अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांना एक विश्वास मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा हादरा अशोक चव्हाण यांच्याकडून दिला जाऊ शकतो.
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांची कर्मभूमी असलेला हाच जिल्हा आता भाजपचा गड झाला आहे. चव्हाण गट भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडे नांदेडमध्ये चेहरा राहिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला याचा फटका बसला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली असली तरी आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार? अशी काँग्रेसची अवस्था नांदेड जिल्ह्यात झाली आहे.
नांदेडच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाकडे झुकण्याची परंपरा आहे. चव्हाण गट भाजपमध्ये गेल्याने ग्रामपंचायत, नगरपालिका पातळीवरील अनेक नेते आता भाजपच्या वाटेवर येतील. राजुरकर यांची उमेदवारी म्हणजे "अशोक चव्हाण भाजपमध्ये पूर्णपणे सेटल झाले" याची अधिकृत घोषणा आहे. भाजपसाठी ही मराठवाड्यात काँग्रेस संपवण्याची खेळी आहे, पण पक्षांतर्गत निष्ठावंतांची नाराजी ही भाजपची डोकेदुखी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.