ashok Chavan, pratap chikhlikar  Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : अशोक चव्हाणांना भाजपने स्वीकारले, चिखलीकर मनाने स्वीकारणार का?

Laxmikant Mule

Nanded Political News :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने स्वीकारले आहे. पण नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांना मनाने स्वीकारणार का? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला किता फायदा होईल ते येणाऱ्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईलच. पण खासदार चिखलीकर यांचे राजकीय नुकसान आणि खच्चीकरण होणार, असे दिसते.

चव्हाण यांचा मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश झाला, तेव्हाची चिखलीकरांची देहबोली ही बरचं काही सांगणारी होती. सगळे भाजपनचे नेते उत्सफुर्तपणे टाळ्या वाजवत असताना चिखलीकरांची टाळी काही लागत नव्हती. चव्हाणांनी त्यांचा हात हातात घेऊन एकजुटीचा आव आणला खरा. पण गेली कित्येक वर्ष एकमेकांचे पाय खेचण्याचे राजकारण करणाऱ्या या दोन नेत्यांना एकाच जिल्ह्यात सांभाळणे म्हणजे एका म्यानात दोन तलवारी ठेवण्यासारखे होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटू नये म्हणजे झाले.

Ashok Chavan चा भाजप प्रवेश होऊन आठवडा उलटाला आहे. या प्रवेशाची राज्य व देशपातळीवर चर्चा सुरू आहे. गेल्या दिड- दोन वर्षांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू होती, तिला खासदार चिखलीकरांकडूनही दुजोरा दिला जात होता. अखेर चव्हाण यांनी मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, अशा दाव्यानंतरही हा प्रवेश झाला. चव्हाण यांच्यामुळे पक्षाचे बळ वाढेल. पण चिखलीकरांचे काय होणार? अशी चर्चा त्यांच्या समर्थकात सुरू झाली आहे.

चिखलीकर चेहऱ्यावर कितीही उसणे हसू आणि आनंद दाखवत असले तरी त्यांना चव्हाण यांचा भाजप प्रवेश मान्य नव्हता, हे स्पष्ट आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या तेव्हा तेव्हा चिखलीकरांनी त्यांच्यावर ते भाजपच्या दारात गेले, बुडत असलेला भाऊराव चव्हाण साखर कारखाना वाचवण्यासाठी आमच्या नेत्यांसमोर दीडशे कोटींच्या थकहमीसाठी हात पसरले, असे म्हणत खदखद व्यक्त केली होती. पण पक्षश्रेष्ठींनी चिखलीकरांपेक्षा अशोक चव्हाण यांच्यामुळे राज्यभरात भाजपला होणाऱ्या फायद्याचे गणित लक्षात घेत त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. त्यावरच चिखलीकरांचा अंतर्गतविरोध पायदळी तुडवून चव्हाण भाजपवासी झाले.

चिखलीकर बॅकफूटवर

कधीकाळी एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये सोबत काम केलेले हे जिल्ह्यातील दोन नेते पुन्हा एकत्र आले, पण भाजपमध्ये. सहाजिकच जिल्ह्याच्या राजकारणात फ्रंट सीटवर असलेले चिखलीकर आता चव्हाणांमुळे बॅकसीटवर गेले आहेत. याचा राग त्यांच्या मनात बंडाची ठिणगी तर टाकणार नाही ना? असेही बोलले जाते. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांनी पाहिले आहे.

पंचवीस वर्षांच्या राजकीय प्रवासात या दोन नेत्यामध्ये अनेकदा संघर्ष भडकला. आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका या सगळ्या अस्त्रांचा वापर दोघांनीही ऐकमेकांविरुद्ध केला. आता ते सगळं विसरून गळ्यात गळे घालायचे म्हटले, तर दोघांनाही कठीण जाणार आहे. मराठवाड्यात शतप्रतिशत भाजप करण्यासाठी अशोक चव्हाण यांना पक्षात पायघड्या घालून स्वागत केले गेले. पण याच पायघड्यात पाय अडकून चिखलीकरांना पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात चिखलीकरांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता‌ नाकारता येत नाही.

ते चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम करत नांदेड शहर व जिल्ह्यात भाजपला बळ देण्यासाठी किती प्रयत्न करतात, हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केले आहे. दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंधही होते. पण चिखलीकरांनी काँग्रेस सोडली व त्यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत हा संघर्ष टोकाला गेला होता. पण हे दोन्ही नेते भाजपच्या एकाच व्यासपीठावर इथून पुढे दिसणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेचा उमेदवार चव्हाण ठरवणार ?

लोकसभा निवडणुकीची तयारी चिखलीकरांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. त्यांना पक्ष पुन्हा उमेदवारी देतो की नाही? उमेदवारी दिली तर अशोक चव्हाण त्यांना किती मदत करतात ? हे बघावे लागेल. तसेच चिखलीकरांना उमेदवारी दिली नाही व अशोक चव्हाण यांच्या शिफारशीनुसार पक्षाने उमेदवारी दिली तर चिखलीकर या उमेदवारास किती सहकार्य करतील? यावर राजकारणाची पुढील दिशा ठरेल.

भाजपमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकदिलाने काम केले तर नांदेड जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल. त्या सोबतच ज्या उद्देशाने भाजपने आटापिटा करून अशोक चव्हाण यांना पक्षात प्रवेश दिला तो उद्देश ही यशस्वी होईल. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मागचे सगळे वाद विसरून पुन्हा एकदिलाने काम करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT