Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना घरातूनच धक्का बसण्याची शक्यता; नातलग विधानसभा निवडणूक लढणार ?

Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही खासदार प्रताप चिखलीकरांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जिल्ह्यातील समीकरणच बदलले आहे.

Sachin Waghmare

Nanded News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात भाजप सावरत असतानाच धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपचे नेते महाविकास आघाडीला जवळ करीत असल्याने भाजप बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही खासदार प्रताप चिखलीकरांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जिल्ह्यातील समीकरणच बदलले आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महिनाभरात नांदेडमधील भाजपचे नेत्या व माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी भाजपला (Bjp) रामराम करीत आघाडीला जवळ केले असताना आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजप सोडणार असल्याची चर्चा जोरात आहे. (Ashok Chavan News)

त्यासोबतच भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशोक चव्हाण यांना घरातून धक्का बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर खतगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या सुनबाई लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. उमेदवारीबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र, फडणवीस यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली होती.

भास्करराव पाटील खतगावकर यांची नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि देगलूर मतदारसंघात मजबूत पकड आहे. बराच काळ ते काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा ते पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतले होते. तर काही दिवसापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आता मात्र खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. त्या अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात अशोक चव्हाणांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जुळवाजुळव

डॉ. मीनल पाटील यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघांतून अपक्ष निवडणूक लढवावी, अशा हालचाली सुरू असल्याचे संकेत दिसत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे राजेश पवार हे करतात. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी त्या भागातील एक मोठा गट सक्रीय झाला असला, तरी त्यावरच्या अंतिम निर्णयासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळेच खतगावकर गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची जुळवाजुळव सूरी केली आहे. त्याची सुरुवात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी धर्माबादजवळ होणार्‍या एका मोठ्या कार्यक्रमाद्वारे होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT