Ashok Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : तेलंगणाच्या विजयाची अशोक चव्हाणांनी दिलेली गॅरंटीही खरी ठरली...

Laxmikant Mule

Marathwada Political News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ला असला तरी दक्षिणेतील तेलंगणात विजयाचा झेंडा फडकवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचाही या विजयात मोलाचा वाटा होता. (Ashok Chavan News) तीन राज्यांतील भाजपच्या विजयात मोदींची गॅरंटी चालली, तशीच गॅरंटी अशोक चव्हाण यांनी तेलंगणातील विजयाची दिली होती.

चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे तेलंगणातील 15 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पैकी सहा ठिकाणी काँग्रेसला (Congress) विजय मिळाला आहे. हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा कमी वाटत असले तरी आधी या भागात काँग्रेसला केवळ दोन जागा होत्या, त्या वाढून आता सहा झाल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी या भागात घेतलेली मेहनत फळाला आली असेच म्हणावे लागेल.

प्रचार सभे दरम्यान, अशोक चव्हाण यांनी तेलंगणात शंभर टक्के काँग्रेसचे सरकार येणार याची गॅरंटी दिली होती. कालच्या निकालानंतर ती खरी ठरली आहे. तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसला धोबीपछाड देत सत्ता संपुष्टात आणली. (Marathwada) राज्याच्या निर्मितीनंतरच्या तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली आहे. ही सत्ता आणण्यासाठी तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा खूप मोठा वाटा आहे. यात अशोक चव्हाण यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच सीमावर्ती भागातील पंधरा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी यशस्विपणे पार पाडत कठीण परिस्थितीत असलेल्या सहा जागा निवडून आणत चव्हाण यांनी आपला प्रभाव दाखवला. तेलंगणातील विजयाने चव्हाण यांचे पक्षातील राजकीय वजनही वाढल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण ज्या नांदेड जिल्ह्यातून राजकारण करतात तो तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात येतो. ही भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी नांदेडची निवड केली होती. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नांदेड शहरात मोठी सभा घेऊन के. चंद्रशेखर राव यांनी अशोक चव्हाण यांना आव्हान दिले होते.

तसेच जिल्ह्यातील विविध भागात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. याचा फटका चव्हाणांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे बीआरएसला कसे रोखता येईल? याविषयी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली होती. तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसला चारीमुंड्या चीत केले. यात तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी खूप मोठी शक्ती लावली होती.

निवडणुकीच्या सव्वा महिना आधी अशोक चव्हाण यांची तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निरीक्षक पदाची घोषणा करण्यात आली होती. काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर चव्हाण यांच्यावर समन्वयाची जबाबदारी होती. त्यानुसार त्यांनी प्रारंभी हैदराबाद येथे तळ ठोकून पक्षाने दिलेले काम पूर्ण केले. त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतही असल्याने त्यांनी प्रचारातही सहभाग घेतला.

पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेलगतच्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवली होती. या भागात पूर्वी काँग्रेसचे केवळ दोन आमदार होते, या निवडणुकीत ही संख्या सहावर गेली आहे. सीमावर्ती भागात काँग्रेसने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये बोधन, जक्कल, खानापूर, नारायणखेड, निजामाबाद ग्रामीण आणि येल्लारेड्डीचा समावेश आहे. या भागात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाचे काम करण्यात आले.

या भागात प्रचार सभांचे नियोजन, चौक सभा, प्रचाराची रणनीती याचे योग्य नियोजन करत चव्हाणांनी पक्षाला विजय मिळवून दिला. तसेच नांदेड जिल्ह्यातील आमदार जितेश आ़तपूरकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, डॉ अंकुश देवसरकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रचार केला. त्यामुळे तेलंगणाच्या विजयात चव्हाणांचे योगदानही मोलाचे ठरले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT