Ujjwal Nikam Sarkarnama
मराठवाडा

Ujjwal Nikam : "अशोकराव, आता दिल्लीत तुमची वकीली करणार!" उज्ज्वल निकमांच्या 'त्या' विधानाने राजकीय भुवया उंचावल्या!

Ashok chavan and Ujjwal Nikam latest political news : उज्ज्वल निकम यांनी अशोकरावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या विधानामागील राजकीय संकेत आणि प्रतिक्रिया जाणून घ्या.

Jagdish Pansare

BJP Politics : खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील एका खाजगी कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाचे राज्यसभेतील सहकारी खासदार अॅड उज्ज्वल निकम यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निकम यांनी राज्यसभेत अशोक चव्हाण हे पहिल्या बाकावर बसतात आणि मी शेवटच्या असे सांगतानाच अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेतील कामाचे कौतुक केले. तुमच्या पिताश्रींनी मला वकील केले, आता दिल्लीच्या दरबारात मी तुमची वकीली करणार, असे म्हणत निकम यांनी धमाल उडवून दिली.

मुंबई बॉम्ब स्फोटासह झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अनेकांना फासावर लटकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे निष्णात वकील, कायदे तज्ञ उज्ज्वल निकम यांची नुकतीच भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली. राज्यसभेत खासदार झाल्यानंतर निकम यांनी सभागृहातील आसन व्यवस्था, तिथे आपल्या पक्षासह विरोधकांकडून मांडले जाणारे प्रश्न, मुद्दे, बीलांवरील चर्चा याचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. कायद्याचे अभ्यासक असलेल्या निकम यांनी याच अनुषंगाने राज्यसभेतील आसन व्यवस्थेत आपण सर्वात शेवटच्या बाकावर बसतो असा उल्लेख केला.

अर्थात खासदारांचा अनुभव आणि त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर कोणी कुठे बसायचे? याचे काही नियम आहेत, आणि त्यानूसार ही आसन व्यवस्था केलेली असते हे ही निकम यांनी आपल्या भाषणात सांगीतले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात निकम यांनी त्यांच्या राज्यसभेतील कामकाजाचे व नांदेड जिल्ह्यातील विकास कामांसाठी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पाठपुराव्याचे कौतुक केले. अशोक चव्हाण हे पहिल्या बाकावर बसून तन्मयतेने काम करतात. विशेषतः नांदेड जिल्ह्याचे प्रश्न ते सभागृहात मांडतात आणि ते सोडवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो, हे मी पाहतो आहे.

नांदेडसह मराठवाड्याच्या विकास कामांचा आवाज राज्यसभेत बुलंद करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता त्या सभागृहात असणे गरजेचे आहे. अशोक चव्हाण यांच्या पिताश्रींनी मला वकील केले. त्यांच्या आशिर्वादानेच मी काम करत आलो आहे. आता मला दिल्ली दरबारी अशोक चव्हाण यांची वकीली करायची आहे, असे सांगत ते ज्या तळमळीने नांदेड, मराठवाड्यासाठी काम करतात त्याची खरचं गरज आहे. आज सकाळी नांदेडला आलो ती रेल्वे अतिशय संथ गतीने धावत होती. साडेदहा वाजता मी इथे पोहचलो. विमानसेवा ऐनवेळी कधी रद्द होईल? हे सांगता येत नाही.

अशावेळी रेल्वे, विमानसेवा यासह नांदेड आणि मराठवाड्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यांचा आवाज कायम राज्यसभेत घुमला पाहिजे. त्यासाठी मी दिल्लीत त्यांची वकीली करणार आहे, याचा पुनरुच्चार निकम यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता.

मराठवाडा, महाराष्ट्रातील एक मराठा चेहरा, दोनवेळा मुख्यमंत्री, खासदार, विविध खात्याचे मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या पक्ष प्रवेशाने भाजपाची नांदेडसह मराठवाड्यात ताकद वाढली. भाजपाने काही महिन्यातच अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. विधानसभा निवडणुकीत भोकर या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देत आमदार केले.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषदेच्या निवडणुकीतही अशोक चव्हाण यांनी शब्द टाकला आणि राज्य व केंद्रातील नेतृत्वाने तो खाली पडू दिला असे झाले नाही. एवढं सगळं असलं तरी अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्री पदाची संधी काही मिळाली नाही. यांची खंत त्यांच्या समर्थकांना अजूनही आहे. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. अशावेळी खासदार उज्ज्वल निकम यांनी अशोक चव्हाण यांची दिल्ली दरबारी वकीली करण्याचा शब्द नांदेडमध्ये येऊन दिल्याने निकम यांच्या विधानाचा रोख मंत्रीमंडळातील चव्हाण यांच्या समावेशाकडे तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT