<div class="paragraphs"><p>Ashok Chavan-Vinayak Mete</p></div>

Ashok Chavan-Vinayak Mete

 

Sarkarnama

मराठवाडा

अशोक चव्हाण वैतागून म्हणाले, मेटे तुम्हाला नेमकं काय पाहिजे?

जगदीश पानसरे

औरंगाबाद : गेल्या सरकारच्या काळात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित (Chhatrapati shivaji maharaj) स्मारकाच्या कामात अनेक त्रुटी ठेवण्यात आला. मासेमारी, समुद्रातील जैविकता, मीठागार आदींचे प्रश्न आणि पर्यावरणाच्या परवानग्या या विषयाला धरून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका झाल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मुदतीत सुरू होऊ शकले नाही.

त्यामुळे संबंधितांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणतात, मुदतवाढ का दिली? मग मेटे नेमकं तुम्हाला काय पाहिजे? असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधान परिषदेत विचारला. आमदार विनायक मेटे यांनी सभागृहात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचा मुद्दा उपस्थित करत अशोक चव्हाण यांच्यावर एकाचवेळी प्रश्नांची सरबत्ती केली.

तेव्हा वैतागलेल्या चव्हाण यांनी मेटे यांना उद्देशून नेमक तुम्हाला काय पाहिजे? असा प्रश्न विचारला. मेटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सभागृहात उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, मेटेंनी एकाच वेळी दहा ते बारा प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे माझ्या स्मरणात राहिले तेवढ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पुर्ण व्हावे, ही जशी तुमची इच्छा आहे, तशीच आमची देखील आहे.

परंतु या स्मारकाच्या उभारणीत आवश्यक असलेल्या परवानग्या घेतांना ज्या त्रुटी तुमच्या सरकारच्या काळात राहिल्या त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या. त्यात प्रामुख्याने मासेमारी, समुद्रातील जैविकता, मीठागारांचा समावेश आहे. या सर्वाच्या याचिकांवर उत्तरे देण्याचे काम सरकार करते आहे. सुप्रीम कोर्टाने हा विषय उच्च न्यायालयात पाठवला आहे.

सरकार या सगळ्या याचिकाकर्त्यांच्या आक्षेपाला समाधानकारक उत्तर देत आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि गेल्या दीड दोन वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा परिणाम देखील या सगळ्या कामावर झाला. न्यायालयातील सुनावण्या नियमित होत नव्हत्या, व्हर्च्युअल पद्धतीने काही सुनावण्या झाल्या पण एकूणच सगळ्या प्रक्रियेला विलंब झाला.

तुमच्या काळात जर या सगळ्या गोष्टी आणि परवानग्यांच्या योग्य अभ्यास झाला असता, तर आज महाराजांच्या स्मारकाचे काम रखडले नसते, असे मी म्हणून शकतो, पण तसे म्हणणार नाही, असा टोला देखील अशोक चव्हाण यांनी मेटे यांना लगावला.

मुदतवाढ का दिली? असे तुम्ही विचारता, पण आधीच स्मारकाच्या कामाला विलंब झाला आहे, पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात वेळ जाऊ नये म्हणून संबंधितांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. कुठलाही अतिरिक्त खर्च यासाठी लागणार नसल्याचेही चव्हाण यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT