Ashok Chavan-Shrijaya, Amita Chavan Sarkarnama
मराठवाडा

MP Ashok Chavan News : अशोक चव्हाणांमुळेच विकास म्हणणारे आता विचारतायेत त्यांनी काय केले ?

Jagdish Pansare

Nanded BJP-Congress Political News : राजकारणात पलटी मारणे किती महागात पडते याचा अनुभव सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण घेत आहेत. नांदेड जिल्हा आणि हक्काच्या घरच्या भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांना कधीकाळी त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते जाब विचारू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नांदेड (Nanded) मध्ये विजय मिळाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असतांना अशोक चव्हाण भोकरमध्ये अडकून पडले आहेत. गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक वेळ त्यांनी याच मतदारसंघात घातल्याचे बोलले जाते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यापासून अशोक चव्हाण यांची जिल्ह्यावरील पकड सैल झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव तर झालाच, पण अशोक चव्हाण व त्यांच्या कुटुंबाने कायम प्रतिनिधित्व केलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातही म्हणावे तसे मताधिक्य प्रताप पाटील चिखलीकर यांना तेव्हा मिळाले नव्हते. लोकसभेत फटका बसल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेत भोकरमधून मुलगी श्रीजया हिच्या विजयात कुठलीही अडचण येणार नाही, यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

पण पहिल्यांदाच चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना मतदारसंघात टोकाचा विरोध होताना दिसतो आहे. तो देखील जे काँग्रेसचे पदाधिकारी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कृपेमुळे नावारुपाला आले, ओळखले जाऊ लागले तेच आता अशोक चव्हाण यांनी मतदारसंघात काय विकास केला? असा प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. यापुर्वी म्हणजे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना हेच कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यामुळेच भोकर आणि नांदेड जिल्ह्यात विकासाची गंगा आल्याचे छाती फुगवून सांगयाचे.

मात्र काँग्रेसची साथ चव्हाणांनी सोडताच तेच पदाधिकारी, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अशोक चव्हाण यांनी इतकी वर्ष मतदारसंघासाठी काय केले? असा सवाल करत आहेत. एकूणच अशोक चव्हाण यांना भोकरमधून मुलीला विधानसभेवर पाठवण्याची इच्छा पुर्ण करतांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार असे दिसते. विकासकामांचा जाब विचारतानाच मुलीला आमदार करण्यासाठी सरसावलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून घराणेशाहीची टीकाही होऊ लागली आहे. त्यामुळे यावेळी भोकर आणि नांदेड जिल्ह्यातील राजकारणात गुरु- शिष्यांचा संघर्ष भडकणार, असे चित्र आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा इतिहास पाहता या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर खासदार अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि आता या कुटुंबाची तिसरी पिढी श्रीजयाच्या रुपात हा राजकीय वारसा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अशोक चव्हाण कामाला लागले आहेत.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, माजीमंत्री भास्कर पाटील खतगावकर, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी फौज सोबत असताना महायुती पराभूत झाली. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. या विजयाने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अंगात दहा हत्तींचे बळ संचारले आहे. खासदार झाल्यानंतर वसंतराव चव्हाण यांचे दोन महिन्यातच निधन झाले. काँग्रेस पक्षाला संपुर्ण जिल्ह्यात याची सहानुभूती आहे. कदाचित विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस इच्छुकांची संख्या विधानसभा आणि लोकसभेसाठी वाढली आहे.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याच तालमीत तयार झालेले काँसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, गोविंद गौड, बाळासाहेब पाटील रावणगावकर, दामिनी ढगे हे प्रमुख इच्छुक भोकरमधून लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांनी आतापासून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे मुलीच्या राजकारणातील ग्रॅंड एन्ट्रीसाठी उत्सूक असलेल्या अशोक चव्हाणांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT