Nanded Political News : नांदेडमधून राज्यातील राजकारणात शिरकाव करणाऱ्या 'एमआयएम'ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे पुन्हा एकदा नव्याने संधी उपलब्ध झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप एन्ट्रीनंतर नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Nanded Politics)
नांदेड शहरातून 'एमआयएम'ने पक्षवाढीसाठी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सुरुवात केली. पहिल्याच फटक्यात नांदेड महानगरपालिकेत 'एमआयएम'चे बारा नगरसेवक निवडून आले होते. याची धास्ती अशोक चव्हाण यांनी घेतली व 'एमआयएम'चा विविध हातखंडे वापरून बंदोबस्त केला होता, पण अशोक चव्हाण सध्या काँग्रेस सोडून भाजपत आल्याने 'एमआयएम'ला पक्षाच्या वाढीसाठी संधी मिळाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नांदेड जिल्ह्यात एक धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून अशोक चव्हाणांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दलित, मुस्लिम मतदार एकत्र आले व काँग्रेला बळ देण्याचे काम केले. नांदेड महापालिकेत गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 25 पेक्षा जास्त मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवकही काँग्रेसचेच आहेत. भाजपत अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर नांदेड शहरातील व जिल्ह्यात मुस्लिम नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट देऊन काँग्रेसमध्येच राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. नांदेड शहरातील सामाजिक व धार्मिक समीकरण पाहता मुस्लिम व दलितांची लोकसंख्या मोठी आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात मुस्लिमबहुल भागात 'एमआयएम'चे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले व यात त्यांना काही प्रमाणात यश आले होते. त्यांचा भाजप प्रवेश एमआयएमच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
नांदेड शहर व जिल्ह्यातील मुस्लिम मतदारांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. ही परिस्थिती एमआयएमला पोषक मानली जात आहे. मुस्लिम मतदारात पुन्हा एकदा एमआयएमकडे ओढा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत.
काँग्रेसने वेळीच दक्षता घेऊन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही, तर याचा मोठा फटाका बसू शकतो, तर दुसरीकडे एमआयएमला मिळालेल्या संधीचे त्यांचे नेते कसे सोनं करून घेतात, यावर सगळे अवलंबून असणार आहे. एकंदरीत नांदडमध्ये एमआयएमच्या पतंगाला पुन्हा हवा मिळू शकते, अशी राजकीय परिस्थिती अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवशाने निर्माण झाली आहे.
Edited By-Ganesh Thombare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.