Chhatrapati Sambhajinagar : विधानसभेच्या काल झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये सरासरी 68.89 मतदानाची नोंद झाली. यामध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण मध्ये मतदारांमध्ये उत्साह अधिक दिसून आला. तर शहरी भागात दिवसभर संथ गतीने सुरू असलेले मतदान शेवटच्या तासाभरामध्ये वाढल्याचे चित्र दिसून आले. शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतांची नोंदणी झाली.
सहा वाजेच्या आकडेवारीनुसार मध्ये 59.35% मतदान झाल्याचे समोर आले. हा आकडा शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांना धडकी भरवणारा आहे. शिवसेना महायुतीचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांच्या थेट लढत होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमुळे ही लढत चौरंगी झाली. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदार संघातून एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील यांना महायुतीच्या संदिपान भुमरे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते.
एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएम ने मध्य मतदार संघातील आपली ताकद दाखवून दिली होती. हीच ताकद आणखी प्रभावीपणे विधानसभा निवडणुकीत दाखवण्यासाठी एमआयएम ने गेल्या निवडणुकीत 80 हजाराहून अधिक मते घेतलेल्या नासेर सिद्दिकी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी पूर्वाश्रमीचे एमआयएमचे जावेद कुरेशी यांना उमेदवारी देत मध्य मतदार संघातील लढत चौरंगी च्या वाटेवर नेऊन ठेवली.
मध्य मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण होते. सकाळी नऊ पर्यंत 7.22% इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर दोन तासात यात दहा टक्क्यांनी वाढ होऊन हे प्रमाण 17.72 टक्क्यांवर पोहोचले. दुपारी एक वाजता हेच प्रमाण 30 टक्क्यांवर पोहोचले होते.
दुपारच्या टप्प्यात मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही तीन वाजता 41.31% असलेले मतदान पाच वाजता 53.98% आणि मतदान संपेपर्यंत 59.35 टक्क्यांवर स्थिरावले. जिल्ह्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत मध्य मधील हे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीमुळे शिवसेनेच्या पारंपारिक हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचे दिसून येते.
2014 चा अनुभव गाठीशी असल्यामुळे मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नसल्याचे बोलले जाते. याउलट मुस्लिम बहुल भागामध्ये मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघे एकमेकांच्या विरोधात लढले आणि हिंदू मतांमध्ये झालेल्या फाटाफुटीचा फायदा घेत एमआयएमने (MIM) मध्य ची जागा जिंकली.
2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना सिद्दिकी यांनी प्रदीप जैस्वाल यांना चांगली टक्कर देत तब्बल 80 हजार मते मिळवली होती. हे प्रमाण पाहता आणि 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा हिंदू मतांमध्ये होणारे विभाजन याकडे बारकाईने लक्ष दिले तर गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले सिद्दिकी यावेळी चमत्कार घडवू शकतात, अशी परिस्थिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात हे मराठा, ओबीसी मतदान कितपत खेचतात? यावर प्रदीप जैस्वाल यांच्या पराभवाचे गणित अवलंबून असणार आहे. मात्र हिंदू बहुल भागात मतदारांमध्ये दिसून असलेला निरुत्साह पाहता एमआयएमचे नासेर सिद्दिकी आणि वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुरेशी यांच्यामध्ये मुस्लिम मतांचे विभाजन किती प्रमाणात होते? यावर मध्याचा आमदार ठरणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला मुस्लिम मतदार लोकसभा निवडणुकीतही कायम होता.
लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पराभव झाल्यानंतर एमआयएमची ही वोट बँक आणखी ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्याचे चित्र आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी व त्यांचे वादग्रस्त बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे संभाजीनगर मध्ये आठवडाभर तळ ठोकून होते.
गल्लोगल्ली पदयात्रा, कॉर्नर सभा आणि जाहीर सभा घेत मतदान फुटू देऊ नका असे, आवाहन त्यांनी केले होते. याचा चांगला परिणाम मध्य मतदारसंघात दिसू शकतो. कालच्या मतदानानंतर समोर आलेल्या आकडेवारीने प्रदीप जैस्वाल यांना धडकी भरली आहे. तर एमआयएमच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.