Aurangabad District Bank Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad District Bank Election: औरंगाबाद जिल्हा बँकेवरील सत्तेसाठी महायुतीचा जोर, महाविकास आघाडीत फूट पडल्यानं मैदान मोकळे?

Chhatrapati Sambhajinagar News: अंबादास दानवे महायुतीला जाऊन मिळाल्याने मविआला 12 पैकी 9 जागांवरच उमेदवार उभे करता आलेत. तर आधीच्या बिनविरोध आलेल्या 8 मधून फुलंब्रीची एक जागा मविआची आहे, तर महायुतीने 7 जागा मिळवल्या आहेत.

Jagdish Pansare

Mahayuti-Mahavikas Aghadi : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या पॅनलमध्ये थेट निवडणुक होत असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा माजी संचालक अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच फूट पडल्याचे चित्र आहे.

महायुतीने वीसपैकी सात जागा बिनविरोध निवडून आणत निम्मी लढाई जिंकली आहे, आता उर्रवरित 12 पैकी किमान सहा ते आठ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट घेऊन महायुतीचे नेते मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार हे कामाला लागले आहेत. मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असले तरी जिल्ह्यातील नेत्यांचे डोळे मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे आणि प्रचार यंत्रणा राबवण्याकडे लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी मतदानाच्या 24 तास अगोदर म्हणजेच शुक्रवारी सकाळी 8 वाजता थंडावणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात 9 केंद्रांवर शनिवारी (ता.4) मतदानाची प्रक्रिया पार पडेल. एकूण 1053 मतदार यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत आठ जण बिनविरोध संचालक झालेत. उर्वरीत १२ जागांसाठी ही निवडणूक होत असून 31 उमेदवार रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1053 मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे 682, बिगरशेती मतदारसंघाचे 323, तर पणन प्रक्रिया मतदारसंघातील 48 मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार (262) हे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील असून खुलताबाद मतदान केंद्रावर सर्वात कमी (32) मतदार आहेत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून बिनविरोध वगळता कन्नड, गंगापूर, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यांत 4 जागांसाठी, तर बिगर शेती मतदारसंघ 5, महिला प्रतिनिधी 2 आणि इतर मागास वर्गीय सदस्य 1 अशी एकूण 12 जागांसाठी शनिवारी मतदान होईल.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (ता.5) सकाळी 8 वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातील सभागृहात मतमोजणी सुरू होईल. महायुती व मविआच्या पॅलनमध्ये थेट ही लढत होत आहे. दोन्ही पॅनलकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी जोर लावला जात आहे. मंत्री अतुल सावे, खा. डाॅ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत.

महायुती बहुमताजवळ

अंबादास दानवे महायुतीला जाऊन मिळाल्याने मविआला 12 पैकी 9 जागांवरच उमेदवार उभे करता आलेत. तर आधीच्या बिनविरोध आलेल्या 8 मधून फुलंब्रीची एक जागा मविआची आहे, तर महायुतीने 7 जागा मिळवल्या आहेत. बहुमतासाठी आता महायुतीला 4 जागा निवडून आणणे गरजेचे आहे. तरीही संपूर्ण 12 जागांवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने महायुतीने फिल्डींग लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT