Sameer Sattar Abdul Sattar sarkarnama
मराठवाडा

Aurangabad District Bank : विलास भुमरे- समीर सत्तार जिल्हा बँकेच्या मैदानात; बिनविरोधसाठी नेत्यांची तडजोडीचीही तयारी!

Vilas Bhumre vs Sameer Sattar district bank election : औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत विलास भुमरे आणि समीर सत्तार मैदानात उतरल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून तडजोडीचे प्रयत्न सुरू आहेत.

Jagdish Pansare

Mahayuti-Mahavikas Aghadi : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आता रंगात आली आहे. सहकार कायद्याच्या नव्या नियमानूसार विद्यमान संचालक मंडळातील निम्म्या संचालकांना यंदा निवडणूक लढवता येणार नाही. मात्र आपल्या जागेवर मुलांची वर्णी लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. यात जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या जागेवर त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांनी तर माजी संचालक अब्दुल सत्तार यांच्या जागेवर त्यांचे सुपूत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक महायुतीने एकत्रितपणे लढावी, असे आदेश दिले आहेत. गेल्या संचालक मंडळात अध्यक्ष पदासह सत्तेची सूत्र आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात होती. 1 लाखाहून अधिक सभासद आणि आठशे कोटींवर उलाढाल असलेल्या सर्वात मोठ्या जिल्हा सहकारी बँकेवरील सत्तेसाठी महायुतीतील नेते सरसावले आहेत.

शिवसेनेच्या बँकेवरील सत्तेला हादरा देण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते तथा राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सुरू केले आहेत. तर शिवसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे यांनी सत्ता कायम राखण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणातील वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांच्या दरबारात पोहचल्यानंतर आता महायुतीने एकत्रित पॅनल द्यावे, अशा सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत. महायुतीसाठी बोलणी करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर सोपवली आहे.

सत्तारांना सहा अधिक एक म्हणजे चेअरमन पद शिवसेनेकडे असावे, अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुलगा समीर सत्तार यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर बसवण्यासाठीच त्यांनी विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीची खेळी केली होती, अशी चर्चा आहे. दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र लढत असताना महापालिका, जिल्हा परिषदे प्रमाणेच जिल्हा बँकेतही भाजपाच मोठा भाऊ ठरावा, अशी रणनीती अतुल सावे यांनी आखली आहे.

महाविकास आघाडीकडून खासदार कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीच्या पॅनलला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवड ही बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही भूमिका मांडली.

बिनविरोध निवडीसाठी महायुतीचे नेते लवकरच बैठक घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी असल्याचे विलास भुमरे यांनी सांगीतले. आता ही निवडणूक बिनविरोध होते, की मग महायुती-महाविकास आघाडीतच बिघाडी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बँकेच्या एकूण 21 संचालक पदांसाठी ही हायव्होल्टेज निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 लाख शेतकरी आणि 138 शाखांवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ही प्रतिष्ठेची लढाई लढली जात आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीच्या अंतिम मुदतीनंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

अतुल सावे यांनी भाजपप्रणित पॅनलचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी स्वत: उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबादास दानवे महाविकास आघाडीच्या बाजूने रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र समीर सत्तार, आमदार विलास भुमरे हे ही मैदानात आहेत.

SCROLL FOR NEXT