Chhatrapati Sambhajinagar News, 09 Jun : 'औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने महाभारत पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिकेत भाजपची रणनीती यशस्वी ठरल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेली जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपचे मंत्री अतुल सावे सरसावले आहेत.
जिल्हा बँक हातची जाणार हे लक्षात आल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट महायुतीच्या विधान परिषदेतील उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले. या बंडखोरीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना जिल्हा बँके संदर्भात शब्द देत ही निवडणूक एकत्रित लढू असे सांगत शांत केले.
मात्र, स्थानिक पातळीवर मंत्री अतुल सावे व भाजपच्या नेत्यांनी जिल्हा बँक आम्ही कोणालाही अशीच देणार नाही, असे सांगत दंड थोपटले आहेत. आम्ही निवडणूक ताकतीने लढू पुढील निर्णय राज्याचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असे सांगत सावे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता महायुतीतील नेत्यांमध्येच एकमेकांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत वरिष्ठ नेत्यांचे आदेश पायदळीत उडवले जात आहेत.
सातशे कोटीहून अधिकची उलाढाल असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती असाव्या यासाठी महायुतीमध्येच प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, त्यांची कन्या नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्यासह काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप व इतरांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत.
मंत्री संजय शिरसाट हे कोणत्याही संस्थेचे संचालक अथवा सभासद नाहीत तसे असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. अब्दुल सत्तार यांना हाताशी धरून सिल्लोडमधील एका संस्थेचे आपण सभासद असल्याचे त्यांनी व त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी नमूद केले आहे. हे दोघे सिल्लोडचे स्थानिक आहेत का? असा सवाल भाजपचे उमेदवार व 2024 मध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढलेले राजू शिंदे यांनी घेतला आहे. हाच आक्षेप त्यांनी हर्षदा यांच्या उमेदवारी अर्जावरही घेतला आहे.
या शिवाय खासदार कल्याण काळे यांच्यावर तीन अपत्य असल्याचा आक्षेप खान वाजेद शब्बीर यांनी घेतला. कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी दाखल केलेल्या विविध अर्जांवरही तांत्रिक मुद्द्यावरून आक्षेप घेण्यात आले आहेत. वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्यावर आप्पासाहेब रामकृष्ण पाटील मंदाबाई गोरखनाथ सोनवणे यांनी आक्षेप नोंदवत ते मागील दोन वर्षे संस्थेचे सदस्य नाहीत, त्यांनी मागील वर्षाचा ऑडिट रिपोर्ट जोडला नाही तसेच ज्या बँकेचे सदस्य आहेत ही संस्था क वर्गातील आहे, असा आक्षेप बोलणारे यांच्या अर्जावर घेण्यात आला आहे.
शिवसेनेचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट व भाजपचे राजू शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राजू शिंदे यांनी शिरसाट यांच्या विरोधात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती असताना बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. तर 2024 मध्ये चक्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत शिरसाट यांना आव्हान दिले होते.
आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरसाट बाप-लेकीच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत आपला राजकीय विरोध त्यांनी अधिक तीव्र केला आहे. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षदा शिरसाट यांनीही राजू शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप नोंदवला आहे.
राजू शिंदे ज्या बँकेचे संचालक आहेत त्याचे रजिस्ट्रेशन कट ऑफ डेटनंतर झालेले आहे. तसेच बँकेच्या सभासदत्वाचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला नाही आणि ऑडिट रिपोर्ट जोडलेला नाही, असे तांत्रिक मुद्दे हर्षदा यांनी उपस्थित करत त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी केली आहे. या सर्व आक्षेपांवर आज निकाल दिला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.