Mahayuti-Mahavikas Agadi : गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि एकेक कौल महायुतीच्या बाजूने जाहीर होऊ लागला. भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव, फुलंब्रीच्या अनुराधा चव्हाण या नव्या संचालकांची जिल्हा बँकेत एन्ट्री झाली असून महायुतीने ही बँक ताब्यात घेतली आहे.
बँकेच्या वीस संचालक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित भूमिपुत्र बचाव पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे एकमेव उमेदवार खासदार डॉ. कल्याण काळे हे विजयी झाले आहेत. तर या आधीच बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये काँग्रेसच्या बोरसे यांचा समावेश आहे. पण त्यांनीही महायुतीत सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. इतर उमेदवारांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढवल्याने याची राज्यस्तरावर चर्चा झाली होती. मतदानाआधीच महाविकास आघाडी प्रणित पॅनलमध्ये मोठी फूट पडल्याने याचा फायदा महायुती प्रणित पॅनलला झाला. वीस पैकी आठ संचालक हे बिनविरोध निवडून गेले होते. सात संचालक हे शिवसेना भाजपचे तर एक काँग्रेस पक्षाचा होता. उर्वरित 12 जागांसाठी काल 99% मतदारांनी आपला हक्क बजावला होता. बारा जागांसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 1053 मतदारांपैकी 1048 जणांनी मतदान केले होते.
आज प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यानंतर एकेका मतदार संघातील उमेदवाराचा निकाल जाहीर केला जात होता. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, ही जागा ही बिनविरोध काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे या जागेसाठी निवडणूक झाली आणि त्यात कल्याण काळे यांनी 48 मतं मिळवत प्रतिस्पर्धी महायुती प्रणित पॅनलच्या उमेदवाराला पराभूत केले. कल्याण काळे व अनिल बोरसे वगळता महाविकास आघाडी प्रणित भूमिपुत्र बचाव पॅनलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत ताकदीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने लढवली. अंबादास दानवे हे महायुतीच्या तंबूत दाखल झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये निवडणुकीआधीच फाटाफूट झाली. परिणामी मतदारांनी राज्यात सत्तेत असलेल्या महायुती प्रणित पॅनललाच पसंती दर्शवत वीस पैकी तब्बल 19 उमेदवार विजयी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.