औरंगाबाद : मुंबई येथील बीकेसी मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, असा बार खासदार कृपाल तुमाने यांनी सकाळी माध्यमांवर उडवून दिला होता. (Shivsena) दोन खासदारांपैकी एक मराठवाड्यातील असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. मात्र त्यांचा हा बार आता फुसका ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीकेसीवरील मेळाव्यात कुठल्याच उद्धव ठाकरे गटाच्या आमदार किंवा खासदाराचा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील खासदार आणि आमदारांकडून केले गेलेले दावे फोल ठरले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुंबईतील मेळाव्यात मोठा राजकीय भूकंप घडणार, उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार, खासदार प्रवेश करणार या बातम्या सकाळपासून फिरत होत्या. त्यामागे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपुर्वी केलेला दावा आणि त्याला आज शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (Maharashtra) यांनी माध्यमांसमोर दिलेला दुजोरा हे कारण होते.
त्यामुळे मराठवाड्यातील उद्धव ठाकरे गटाचा कोणता खासदार किंवा आमदार शिंदे गटाच्या गळाला लागला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांनी केलेला दावा हा स्टंटच ठरला. मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यात खासदार, आमदारच काय पण उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील प्रवेश झाला नाही.
तुमाने यांच्या दाव्यानंतर उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देत कोणीही कुठे जाणार नाही असे स्पष्ट केले होते. अखेर तेच खरे ठरले. उध्दवसाहेबांच्या विचाराच सोनं लुटण्यासाठी मराठवाड्यातील आमदार, खासदारासह सर्व एकनिष्ट शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतिर्थावर दिसतील. कोण कुठे जाणार याला आता महत्व राहिलेलं नाही. कोणी कितीही दावे केले तरी जनता उध्दवसाहेबांच्या सोबत असल्याचा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला होता.
दसरा या सणाला संस्कृतीत वेगळ महत्व असुन अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याचा, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा दिवस आपण मानतो. यंदाचा दसरा हा शिवसेनेच्या निष्ठेचे प्रतिक असणार आहे. निष्ठावंतांच्या साथीने कुप्रवृत्तीवर विजय मिळविण्यासाठी आम्ही सज्ज असुन कोणतीही महाशक्ती आम्हाला रोखू शकणार नसल्याचेही राजेनिंबाळकर म्हणाले होते. कुणी कितीही दावे केले तरी आता फारसा फरक पडणार नसल्याचे सांगत त्यांनी खासदार कृपाल तुमाने यांनी केलेला दावा फेटाळला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.