दसरा मेळावा : गर्दी जमली, पण भाषणं जमले नाही..

खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या दीड वर्षाच्या मुलावर केलेली टीका शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेला उत्तर देतांना मात्र शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ( Dasara Melawa)
Cm Eknath Shinde Rally In Bkc Mumbai News
Cm Eknath Shinde Rally In Bkc Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मुंबईत झालेल्या दोन दसरा मेळाव्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे काय बोलणार? तर बीकेसीवर एकनाथ शिंदेची तोफ कोणावर धडधडणार याची उत्सूकता अखेर संपली. बीकेसी सारखे मोठे मैदान गर्दीने खचून भरले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे लांबलेले भाषण लोकांनी निमूटपणे ऐकले देखील. पण लिहून आणलेले मुद्दे आणि त्याभोवती घुटमळत केलेल्या भाषणाने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेली टीका खरी ठरली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांचे भाषण संपत आले तेव्हा शिंदे यांचे भाषण सुरू झाले. त्यामुळे ठाकरेंनी शिंदेवर काय टीका केली याचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आले होते. (Mumbai) त्याला उत्तर देतांनाच शिंदे यांनी काय तो जोश दाखवला. (Maharashtra) सव्वा तासाच्या भाषणात शिंदे कुटुंबावर आणि छोट्या नातवावर झालेल्या टीकेने चागंलेच व्यथीत झाले.

यावरून त्यांनी ठाकरे यांच्यावर आक्रमकपणे टीका केली. परंतु बाकीच्या भाषणात लिहून आणलेले ज्याला उद्धव गट भाजपची स्क्रीप्ट म्हणतो त्याच मुद्याभोवती एकनाथ शिंदेंचे भाषण घुटमळत राहिले. त्यामुळे गर्दी जमली, पण भाषण जमले नाही, असेच बीकेसीवरील मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.

एकनाथ शिंदे शिवसेनेत असतांना त्यांना व्यासपीठावर बोलण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते भाषण कसे करतात हे फारसे कुणाला माहित नव्हते. पण राज्यात शिवसेनेत घडलेले बंड, त्यांचे शिंदे यांनी केलेले नेतृत्व, सुरत गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा रंजक प्रवास आणि अचानक मुख्यमंत्री पदाची गळ्यात पडलेली माळ यातून शिंदे बरेच प्रगल्भ झाले.

विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षपदाच्यावेळी शिंदे यांनी ज्या शैलीत सभागृहात भाषण केले, ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला टोले लगावले ते पाहता आजच्या मेळाव्यात देखील ते धमाल उडवणार अशी तिथे जमलेल्या लाखोंच्या गर्दीला अपेक्षा होती. मात्र शिवाजी पार्कवरच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिंदेना भाजपची स्क्रीप्ट न वाचता भाषण करून दाखवा असे आव्हान दिले आणि नेमके घडले देखील तसेच.

एकनाथ शिंदे हे बीकेसीवरील गर्दीसमोर तब्बल सव्वा ते दीड तास बोलले. न थकता न थांबता, पण त्यांच्या भाषणात दम नव्हता. अनेक मुद्दे ते मराठवाडा आणि राज्यातील त्यांच्या दौऱ्यात बोललेले आहेत. शिवाय त्यांना मुंबईत ऐकण्यासाठी गेलेली गर्दी देखील याच भागातून सर्वाधिक गेली होती. त्यामुळे उपस्थितांनी हा मेळावा म्हणजे पर्यटन म्हणून एन्जाॅय केला असेच म्हणावे लागेल.

Cm Eknath Shinde Rally In Bkc Mumbai News
माझ्या-तुमच्यात काय ठरलं होतं? वेळ आल्यावर सांगेन : शिंदेंचा ठाकरेंना इशारा!

सुरुवातीपासूनच शिंदे समोर ठेवलेल्या कागदातील मुद्यांचा आधार घेत बोलत होते. पीएफआयवरील बंदी, कारवाई, आरएसएसवर बंदीची मागणी, राम मंदीर, कलम ३७० हे भाजपची ब्रॅन्डींग करणारे मुद्दे त्यांच्या भाषणात आले, तेव्हाच ही स्क्रीप्ट भाजपचीच असावी अशी शंका आली? त्यामुळे शिंदे यांचे निम्मे भाषण हे लिहून आणलेल्या मुद्यांच्या आधारावरच झाल्याचे दिसून आले.

उध्दव ठाकरे यांनी कटप्पा अशी केलेली टीका, मंत्रीपद, आमदारकी, खासदारकी दिली तरी गद्दारी केली हा आरोप आणि खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या दीड वर्षाच्या मुलावर केलेली टीका शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेला उत्तर देतांना मात्र शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

आम्ही गद्दारी नाही, गदर केला हे सांगता शिंदे यांचा आवाज चांगलाच वाढला. अनेक ठिकाणी शिंदे यांनी उसने अवसान आणल्याचे पदोपदी जाणवत होते. मुंबईतील दोन्ही मेळावे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचे होते. ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मर्मावर बोट ठेवत टीका केली, त्यात देखील तोच तो पणा होता. पण शिवसैनिकांना त्याची सवय असल्याने त्यांच्या ते भाषण पचनी पडले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने मात्र भ्रमनिरास झाला असेच म्हणावे लागेल..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com