Imtiaz Jalil-Shrikant Shinde News, Aurangabad
Imtiaz Jalil-Shrikant Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : राजकारण वेगळं मैत्री वेगळी म्हणत, शिंदेची खासदार चषक स्पर्धेला भेट..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे माझे चांगले मित्र आहेत. मला खासदार चषक क्रिकेट स्पर्धा आणि महोत्सवाला भेट देण्याची विनंती त्यांनी केली. अनेकजणांनी मला तिकडे जाऊ नका, असे सांगितले. पण महाराष्ट्रातील राजकारणाची परंपरा इतकी खालावली नाही, की मित्राने बोलावले तर दुसरा मित्र जाऊ शकणार नाही. इम्तियाज जलील हे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी म्हणून मी इथे आलो, असे सांगत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी इम्तियाज जलील महोत्सवाला भेट दिली.

आमखास मैदानावर फुटबाॅल स्टेडिअम उभारण्यासाठी जी काही तांत्रिक कागदपत्रांची पुर्तता करायची आहे ती करून केंद्राकडून निधी मिळवून देण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देखील शिंदे यांनी यावेळी दिले. (Imitaiz Jalil) सिल्लोड येथील जाहिर सभा संपल्यानंतर खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या समारोप सामन्याला शिंदे यांनी हजेरी लावली. (Shinde)

इम्तियाज जलील यांच्या गळ्यात हात घालून त्यांची आणि आपली मैत्री किती पक्की आहे, हे देखील शिंदे यांनी उपस्थितांना दाखवून दिले. इम्तियाज जलील यांचा एमआयएम पक्ष आणि एकनाथ शिंदे आता ज्या भाजपसोबत सत्तेत आहेत, त्या पक्षाची विचारसरणी भिन्न आहे. एमआयएमला भाजपची बी टीम म्हटले जात असले तरी मोदी-शहा आणि भाजपवर सर्वाधिक टीका आणि हल्ला याच पक्षाकडून केला जातो.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारची एमआयएम बाबतची भूमिका नेमकी काय आहे? याचा विचार केला तर खासदार चषकाला हजेरी लावलेल्या शिंदे गटातील मंत्री आणि खासदारांवरून दिसून येते. परंतु तरुणाईला नशेखोरी पासून दूर नेण्यासाठी आयोजित या महोत्सवाकडे राजकारण म्हणून पाहू नये अशी अपेक्षा व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांना या महोत्सवाचे आमंत्रण दिले होते.

विशेष म्हणजे शिंदे गटाचे मंत्री व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीच या महोत्सवाचे उद्धाटन केले होते. तर क्रिकेट सामन्यांच्या समारोपाला शिंदे गटाचेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली हा योगायोग म्हणावा, की ठरवून आणलेला योग होता याची चर्चा आता सुरू झाली आहे.

इम्तियाज जलील यांच्या गळ्यात हात टाकत मैत्रीच्या आणाभाका खात खासदार शिंदे यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याने आता अच्छे दिन येतील, असा दावा केला. महोत्सावाला उपस्थितीत तरुणांची गर्दी आणि फुटबाॅल स्टेडिअमची मागणी याचा उल्लेख करत शिंदे यांनी टायमिंग देखील साधले.

आता या स्टेडियमसाठी त्यांची खरंच किती मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या क्रिकेट महोत्सवाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे येवून गेल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT