Imtiaz jalil- Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : राजकीय धुराळा तरीही विरोधक क्रिकेटच्या मैदानात एकत्र..

काही मिनिटांसाठी लावलेली हजेरी आणि त्या दरम्यान दानवे आणि इम्तियाज जलील यांच्यात झालेली चर्चा त्यांच्या विरोधकांना मात्र पचनी पडणार नाही, एवढे मात्र निश्चित. (Mp Imtiaz Jalil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडालेला असतांना इकडे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे नेते क्रिकेटच्या मैदानात मात्र एकत्र दिसत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या खासदार चषक आणि महोत्सवाच्या निमित्ताने हे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी सर्वपक्षीय आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले होते, पण तेव्हा एकमेव राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावली होती. (Shivsena) आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी राजकीय वैर विसरत क्रिकेटच्या मैदानात हजेरी लावली.

इम्तियाज जलील यांनी या दोन्ही नेत्यांचे स्वागत करत क्रिकेटचा आनंद लुटता लुटता चर्चाही केली. अंबादास दानवे हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्या निवडणुकीत दानवे यांना एमआयएमची देखील मदत झाली होती, असे बोलले जाते. कदाचित या मदतीची आठवण ठेवतच त्यांनी इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या महोत्सवात हजेरी लावली असावी.

शिवसेना आणि एमआयएम हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवानंतर तर या दोन पक्षाती दुरावा अधिकच वाढला आहे. तरी देखील एका व्यासपीठावर आल्यानंतर तात्पुरते का होईना राजकीय वैर विसरून इम्तियाज जलील व शिवसेनेचे स्थानिक नेते एकमेकांशी बोलतात, हस्तांदोलन करतात. त्यामुळे अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील महोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्याला हजेरी लावल्याचे जास्त आश्चर्य वाटायला नको.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार उद्घाटनाला आले तेव्हा त्यांनी इम्तियाज जलील यांना चेंडू टाकत त्यांचा त्रिफळा उडवला होता. याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यावर इम्तियाज यांनी सत्तार साहेब मला कधीच आऊट करू शकत नाहीत, ते मला जिंकवतीलच, असे म्हणत दाखवलेले प्रेम यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अंबादास दानवे यांना मात्र अशी संधी मिळाली नाही, त्यांनी फक्त या महोत्सवाला हजेरी लावत इम्तियाज जलील यांना शुभेच्छा दिल्या. काही मिनिटांसाठी लावलेली हजेरी आणि त्या दरम्यान दानवे आणि इम्तियाज जलील यांच्यात झालेली चर्चा त्यांच्या विरोधकांना मात्र पचनी पडणार नाही, एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT