Baba Jafri Sarkarnama
मराठवाडा

NCP Baba Jafri News : धाराशिवच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे बाबा जाफरींचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा!

Dharashiv Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनीही दिला राजीनामा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत?

अविनाश काळे

Dharashiv NCP Politics : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीकडून मतदारसंघांमधील उमेदवार निश्चत केले जात आहे. तर उमेदवार निश्चित करताना दोन्ही बाजूंमधील घटक पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर जाहीर झालेले उमदेवारही बदलले जात आहेत. तर काही ठिकाणी आधी उमेदवारीचा शब्द दिलेल्या उमेदवारांना माघार घेण्यास सांगावे लागत आहे. ऐनवेळी धक्कादायकरित्या दुसऱाच उमेदवार जाहीर केला जात आहे.

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या धक्कादायक निर्णयांमुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते चांगलेच गोंधळलेले आहेत. काही ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचा निर्णय अंतिम मानून पक्ष देईल त्या उमेदवारासाठी कामाला लागले आहेत. तर काही ठिकाणी नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामा देत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशीव(उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघामध्येही असाच प्रकार समोर आला आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसेचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी गुरुवारी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याद्वारे त्यांनी उमेदवारीबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे बाबा जाफरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार(Ajit Pawar) यांनी प्रा. सुरेश बिराजदार यांना मागील सहा महिन्यापूर्वी धाराशीव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घेणार असल्याचे सांगून, निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा अशी सूचना केली होती. त्यादृष्टीने बिराजदार यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजुन काढला होता.'

याशिवाय 'उमेदवारी निश्चित असताना ऐनवेळी शेवटच्या क्षणी दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला पक्ष प्रवेश करून संधी देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बिराजदार जिल्ह्यातील गावागावात जाऊन पक्षाचा झेंडा पोहचवला आहे, मात्र त्यांच्या सारख्या निष्ठावान नेत्यांना डावलले जाते, ही बाब निषेधार्थ आहे.' असे सांगत जाफरी यांनी एक व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

तसेच प्रा. बिराजदार यांच्या सर्वसमावेशक कार्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल असे वातावरण होते. मात्र ऐनवेळी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्याच्या हालचाली झाल्या. बिराजदार यांना डावलल्या गेल्याने कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना समाज माध्यमावर उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT