Babajani Durani Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durani: बाबाजानी दुर्राणींचा दबदबा कायम! पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरले, पक्षाने पुन्हा दिली मोठी जबाबदारी

काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष असलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गेल्या काही महिन्यापासून पक्षांतर्गत विरोधामुळे बराच त्रास सहन करावा लागला.

Jagdish Pansare

Babajani Durani: काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष असलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गेल्या काही महिन्यापासून पक्षांतर्गत विरोधामुळे बराच त्रास सहन करावा लागला. पाथरी नगरपरिषदेत अधिकार नसताना बाबाजानी दुर्राणी यांनी गटनेता बदलण्यासाठी पत्र दिले होते, असा आरोप त्यांच्यावर झाला. एकीकडे पक्षांतर्गत विरोधक तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे सईद खान व त्यांचे भाऊ नगराध्यक्ष आसेफ खान यांना तोंड देत दुर्राणी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्याकडे राखले.

परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद बाबाजानी दुर्राणी यांना मिळाल्यामुळे काँग्रेस पक्ष आता नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नऊ महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाबाजानी दुर्राणी यांच्या मागील शुक्लकाष्ठ काही संपले नाही. पाथरी नगरपरिषदेतील त्यांच्या 25 वर्षाहून अधिक काळ सत्ता आणि कारभारावर शिवसेनेचे सईद खान यांनी गंभीर आरोप करत त्यांच्या मालमत्तेची आणि अनधिकृत उभारलेल्या टॉवरची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी केली होती.

नगरपरिषद निवडणुकीपासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाथरीमध्ये पाहायला मिळाला. विरोधकांशी दोन हात करत असतानाच बाबाजानी दुर्राणी यांना पक्षांतर्गत विरोधालाही तोंड द्यावे लागले. मात्र पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने बाबाजानी दुर्राणी यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करत बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर "तुम्हाला या निर्णयाबद्दल पश्चाताप करण्याची वेळ कधीही येऊ देणार नाही. तुमच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाईल" असा शब्द लातूरचे आमदार व काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी बाबाजानी दुर्राणी यांना दिला होता. "बहुत देर कर दी मेहरबा आते आते", अशा शायराना अंदाजात दुर्राणी यांचा तेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता.

सृजन संघटन मोहिमेदरम्यान काँग्रेसने राज्यातील संपूर्ण संघटनात्मक बांधणीला वेग देत मोठे फेरबदल केले आहेत. परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाजानी दुर्राणी यांची निवड करत पक्षाने पुन्हा एकदा जिल्ह्यात काँग्रेसला पूर्ववैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी काँग्रेसची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशाने ही पोकळी भरून निघाली. 1980 पासून शरद पवार यांच्यासोबत एस काँग्रेसमध्ये काम केलेल्या बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा परभणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. आतापर्यंत ते राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष होते.

पाथरी नगरपालिकेवर त्यांची अनेक वर्ष एकहाती सत्ता होती. तर याच विधानसभा मतदारसंघातून 2004 मध्ये आणि त्यानंतर दोन वेळा विधानपरिषदेवर ते आमदार म्हणून निवडून गेले. 2018 मध्ये पुन्हा त्यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार म्हणून निवड झाली होती. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावरही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणी जिल्ह्यात बाबाजानी दुर्राणी यांच्यावर विश्वास दाखवत ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष त्यांना सोपवले आहे.

SCROLL FOR NEXT