

Pulwama Attack Mastermind: जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दलांच्या ताफ्यामध्ये स्फोटकांनी भरलेली गाडी घुसवून सीआरपीएफच्या ४० जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मास्टरमाईंडपैकी एक असलेला हामजा बुरहान याचा खात्मा करण्यात आला आहे. भारताच्या दुश्मनाचा खात्मा करण्यात आल्यानं सर्वत्र याची चर्चा आहे.
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि २०२२ मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केलेला अल-बद्र दहशतवादी संघटनेचा कमांडर हमजा बुरहान हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे. याच्यावर पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद इथं हल्ला झाला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमधील एम्स (AIMS) कॉलेजबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुरहानवर हल्ला केला. त्याच्या शरीरात अनेक गोळ्या लागल्या आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं जाळ विस्तारण्याचा त्याच्यावर आरोप होता.
२०२२ मध्ये केंद्र सरकारने बुरहानला दहशतवादी घोषित केलं होतं. एका अधिकृत अधिसूचनेत सरकारने म्हटलं होतं की, “अर्जुमंद गुलजार दार उर्फ हमजा बुरहान उर्फ डॉक्टर, वय २३ वर्षे, हा पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील खरबतपोरा येथील रहिवासी असून, तो यूएपीए (UAPA) अंतर्गत घोषित केलेल्या 'अल बद्र' या दहशतवादी संघटनेच्या सहयोगी सदस्यांपैकी एक आहे”
पुलवामा दहशतवादी हल्ला २०१९ मध्ये झाला होता. जेव्हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार याने जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोराजवळ जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा दलांच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवलं होतं. या प्राणघातक आत्मघाती बॉम्बस्फोटात ४० सीआरपीएफ जवानांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय हवाई दलानं काही दिवसांनंतर पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ला केला, ज्यामुळं या दोन शेजारी देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला होता.
पुलवामाच्या रत्नीपोरा भागातील खरबतपोराचा रहिवासी असलेला बुरहान, उच्च शिक्षणाच्या बहाण्याने २०१७ मध्ये पाकिस्तानला गेला होता. मात्र, नंतर तो बंदी घातलेल्या अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि हळूहळू बढती मिळवत तो त्या संघटनेच्या कमांडरपदापर्यंत पोहोचला. नंतर बुरहान काश्मीरला परतला, जिथे तो स्थानिक तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि त्यांची भरती करण्यात गुंतला होता, असा आरोप आहे. कालांतराने, त्याने दक्षिण काश्मीरमध्ये आपले जाळे विस्तारले आणि पुलवामापासून शोपियानपर्यंत आपला प्रभाव वाढवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.