Bachchu Kadu Sarkarnama
मराठवाडा

Bachchu Kadu : बच्चू कडूंचं भाजप अन् काँग्रेसला ओपन चॅलेंज! म्हणाले, 'हिंमत असेल तर...'

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : शेतकरी, मागास, आदिवासी आणि दिव्यांग नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आमदारांच्या पगारावर कायमच आक्षेप घेतला आहे. प्रसंगी कडूंनी विधिमंडळातही आमदारांना मिळणाऱ्या सुविधांबाबत सडेतोड भाष्य केले आहे.

समाजात समानता आणण्याची धमक ना भाजप ना काँग्रेसमध्ये आहे, अशी टीका करत कडू यांनी आमचे 25 आमदार आले तरी प्राध्यापक आणि आमदारांचे पगार कमी करू, असे स्पष्ट केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. तर विरोधात काँग्रेस पक्ष मोठा आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी कराव्यात, असे ओपन चॅलेंजच बच्चू कडू Bachchu Kadu यांनी दिले आहे. मात्र ते या मुद्द्यावर भूमिका घेऊ शकत नाहीत. आमचे 25 आमदार आले तरी आम्ही पहिले ते काम करू, असेही कडूंनी यावेळी स्पष्ट केले.

कडू म्हणाले, सध्या प्राध्यापकाला अडीच लाख, तर आमदारांना तीन लाख एवढा पगार आहे. तो कशासाठी आहे. एका पंक्तीमध्ये काहीच नाही. तर दुसऱ्या पंक्तीमध्ये बळेच टाकताय. कुणाच्या बापाचे राज्य आहे का? आम्ही मते देतोय, त्यामुळे ही गुंडागर्दी चालणार नाही.

भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी प्राध्यापक आणि आमदारांचे पगार कमी करावेत. आमचे 25 आमदार आले तरी आम्ही पहिले प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी करण्याचे काम करू, असा शब्दही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यातील दोन समाजातील आंतरविरोधाच्या स्थितीवरून कडू यांनी सरकार आणि विरोधकांचाही समाचार घेतला. मी जर कोणत्याही धर्माची भाषा बोललो असतो तर आज माझ्या पक्षाचे 25 आमदार असते. मात्र आम्ही हक्काची लढाई लढत आहोत. राज्याला पुरोगामी चळवळींचा मोठा वारसा असल्याने मणिपूरसारखी स्थिती होणार नाही, असा विश्वासही कडूंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT