EX MLA Badamrao Pandit Join BJP News Sarkarnama
मराठवाडा

Badamrao Pandit : गेवराईत पंकजा मुंडेंची खेळी; बदामराव पंडितांच्या पक्षप्रवेशाने 'स्थानिक'मध्ये भाजपचा जोर वाढणार!

EX Minister Badamrao Pandit join BJP : गेवराईत विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. तालुक्याच्या राजकारणात बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह, विजयसिंह पंडित यांच्यात कायम संघर्ष राहिला आहे.

Jagdish Pansare

  1. बदामराव पंडित यांच्या भाजप प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल अपेक्षित आहे.

  2. गेवराई तालुक्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  3. या प्रवेशानंतर बीडमध्ये मुंडे-पंडित गटातील सत्तासंतुलन पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

BJP Political News : माजी मंत्री बदामराव पंडित यांचा भाजप प्रवेश बीड जिल्ह्यातील राजकारणात पक्षासाठी टर्निंग पाॅईंड ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्यावर पक्षाने कुठलीही कारवाई केली नसली तरी ते फारसे सक्रीय नव्हते. अशावेळी आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुका पाहता मंत्री पंकजा मुंडे यांनी बदामराव पंडित यांना पक्षप्रवेश देत बेरजेचे राजकारण केले.

गेल्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी सत्तेची जी समीकरणं जुळवून आणली त्यात बदामराव पंडीत यांच्या पाच सदस्यांची मदत त्यांना झाली होती. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ही आठवण आवर्जून सांगितली होती. सहा महिन्यापासून पक्ष प्रवेशाच्या तयारी असलेल्या बदामराव पंडीत यांच्या भाजप प्रवेशाला अखेर दिवाळीचा मुहूर्त लागला. गेवराईत विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. तालुक्याच्या राजकारणात बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह, विजयसिंह पंडित यांच्यात कायम संघर्ष राहिला आहे.

विजयसिंह पंडित हे चुकून निवडून आलेले आमदार आहेत, पैसे देऊन ते आमदार झालेत, असा हल्लाबोल बदामराव पंडीत यांनी केला आहे. एकूणच भाजपमधील प्रवेशानंतर बदामराव पंडित अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेवराईत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा थेट संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसणार आहे. गेवराईत या प्रवेशाने भाजपाची ताकद निश्चित वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी हा प्रवेश अत्यंत महत्वाचा ठरू शकतो.

पंकजा मुंडे यांच्यावतीने आयोजित परळीतील दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात हा प्रवेश साधेपणाने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण पक्षात काम करणार असल्याचे बदामराव पंडित यांनी म्हटले आहे. बदामराव हे गेवराई मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 आणि 1999 अशा सलग दोन विधानसभा निवडणुका ते अपक्ष लढले आणि जिंकले. तर 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार झाले होते.

2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले पण त्यांचा पुतणे विजयसिंह पंडित यांच्याकडून 42 हजार मतांनी पराभव झाला. आता गेवराईच्या विकासासाठी नवीन अध्याय सुरू करण्याची गरज असल्याचे बदामराव यांनी म्हटले आहे. पंकजा ताईंच्या कार्यपद्धतीतून मला प्रेरणा मिळते आणि मी भाजपच्या वाढीसाठी स्वतःला समर्पित करेन, अशी भावना त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केली होती.

FAQs

1. बदामराव पंडित कोण आहेत?
बदामराव पंडित हे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असून, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न होते.

2. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला?
राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी आणि स्थानिक विकासासाठी अधिक संधी मिळाव्यात म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

3. या प्रवेशामुळे बीडच्या राजकारणात काय बदल होऊ शकतो?
भाजपची ताकद बीडमध्ये वाढेल आणि पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला नवे बळ मिळेल.

4. गेवराईत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष का होणार आहे?
स्थानिक राजकारणात सत्ता आणि प्रभावासाठी विजयसिंह पंडीत आणि बदामराव पंडित यांच्यात जुना वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

5. आगामी निवडणुकांवर या घडामोडींचा परिणाम होईल का?
होय, भाजपच्या अंतर्गत समीकरणांवर आणि बीडच्या मतदारसंघातील मतविभाजनावर याचा थेट परिणाम दिसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT