bajrang sonwane ajit pawar sarkarnama
मराठवाडा

Beed Election News : अजितदादांच्या 'त्या' टीकेला दिले सोनवणेंनी उत्तर; म्हणाले, मावळमध्ये पार्थचा पराभव...

Sachin Waghmare

Beed Election : लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळाल्यानंतर काही जण म्हणाले की, ज्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःची मुलगी निवडून आणता आली नाही, ते काय निवडून येणार ? अशा शब्दांत माझ्यावर टीका केली. मात्र, दादा या निमित्ताने मी एक सांगतो की, माझ्या मुलीचा पराभव तुमच्या कानात येऊन सांगणाऱ्यामुळेच झाला होता.

मावळ लोकसभा निवडणुकीत दादा आपल्या चिरंजीवाला पराभव स्वीकारावा लागला होता तर चौसाळा जिल्हा परिषद गटातून, त्या पालकमंत्र्यांच्या वडिलांना पराभव स्वीकारावा लागला होता, असे म्हणत उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व पालकमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhanjay Munde) निशाणा साधला. (Bajrang Sonavane News)

बीड येथे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना पीडीसीसी बँकेचे कर्ज देत अडचणी दूर करण्याचे काम केले. मात्र, त्यांनी पालकमंत्री अडचणीत असताना त्यांना का पीडीसीसी बँकेचे कर्ज दिले नाही ते सांगावे ? असे आव्हान त्यांनी यावेळी भाषणातून दिले.

सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागाच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. या जिल्हयात ओबीसींचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला आहे. बीड जिल्ह्यात भावा-बहिणीचे सुरु असलेले गुंडा राज्य घालवून येत्या काळात राम राज्य आणणार आहे. जिल्ह्याची ओळख प्रगतशील जिल्हा करण्यासाठी पाठीशी उभे राहण्याचे आव्हान त्यांनी केले.

मला शेतकरी व त्यांच्या लेकरांचे भले करायचे आहे. त्यासाठी मी येत्या काळात काम करणार आहे. ओबीसी व मराठा आरक्षणाचा वाद तापवला जात आहे. संसदेत मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार आहे. त्यासाठी मी जात आहे. त्याठिकाणी मी हसत बसणार नाही तर जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सुमारे तीन लाख ठेवीदारांचे मोठं नुकसान केल्याने ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा या पतसंस्थेच्या विरोधात रिजर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचे सांगत बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्याच्या कारभाराचे वाभाडे काढले.

SCROLL FOR NEXT