Bajarang Sonawane Sarkarnama
मराठवाडा

Bajarang Sonawane : ऊसाला बेचाळीसशे पन्नासचा भाव द्या, शेतकऱ्यांनी खासदार बजरंग सोनवणेंची गाडी अडवली

Sugarcane farmers in Beed stopped MP Bajrang Sonawane’s vehicle: बीडमध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीने खासदार बजरंग सोनवणे यांची गाडी अडवून ऊसाला प्रतिटन ४२५० रुपये दर आणि मागील हंगामातील २०० रुपये थकबाकी तातडीने देण्याची मागणी केली.

Jagdish Pansare

Beed Politics : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न आणि चालू हंगामातील ऊसदराच्या मागणीवरून युवा शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत खासदार बजरंग सोनवणे यांची गाडी नागडगाव फाट्यावर अडवली. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

गतवर्षीच्या ऊस बिलातील प्रतिटन २०० रुपये थकीत रक्कम तातडीने द्यावी, तसेच चालू गळीत हंगामात प्रतिटन ४२५० रुपये भाव मिळावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर युवा शेतकरी संघर्ष समितीने उद्या होणाऱ्या ऊस परिषदेसाठी यापूर्वीच तालुक्यात गावोगावी बैठका घेत शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले आहे.

ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, वाहतूक, खतांची दरवाढ आणि शेतीच्या मशागतीचा खर्च लक्षात घेता सध्याचा ऊसदर परवडणारा नसल्याची भूमिका समितीने मांडली आहे. गतवर्षीच्या बिलातील प्रतिटन २०० रुपयांची थकबाकी आणि चालू हंगामातील दर या दोन्ही प्रश्नांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत समितीने आंदोलनाची दिशा ठरवली.

यापूर्वी समितीने ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी बैठका, निवेदने आणि आंदोलनाच्या माध्यमातून कारखानदार व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा, थकीत रक्कम मिळावी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. आता खासदारांची गाडी अडवून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

चालू हंगामात ऊस गाळप सुरू होण्यापूर्वीच दराचा प्रश्न मार्गी लागावा, अशी समितीची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिल्यानंतर दरासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधीच दर निश्चित करावा, अशी मागणी केली जात आहे. प्रतिटन ४२५० रुपये हा प्रारंभिक दर मिळावा आणि गतवर्षीची थकबाकीही अदा करावी, यासाठी समिती आक्रमक झाली आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात थकीत रक्कम कधी मिळणार आणि चालू हंगामात किती दर मिळणार? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. आश्वासनाची अंमलबजावणी होईपर्यंत ऊसदराचा लढा सुरू ठेवण्याची भूमिका युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT