Bajrang Sonavane  Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonawane : बजरंग सोनवणेंनी दंड थोपटले, निवडणुकीच्या तीन वर्षे आधीच मोठी घोषणा, मी पुन्हा...

Bajrang Sonawane will contest election again : बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीच्या तीन वर्षे आधीच मोठी घोषणा केली आहे. 'मी पुन्हा...' असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जाणून घ्या सविस्तर बातमी.

Rashmi Mane

राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तब्बल 3 वर्षे आधीच पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. 'मी आणखी एकदा निवडणूकीत उभा राहणार आणि निवडून येणार', असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे बीडच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

गेवराई तालुक्यातील श्रृंगऋषी गडावर आयोजित लोकलढा आंदोलनाच्या बैठकीत बोलताना बजरंग सोनवणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मागील निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदारांनी आपल्याला साथ दिली, त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतही जनता आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची विशेष चर्चा होत आहे. 'शिव्या देवून का असेना लोक मला मतदार करतीलच', असं वक्तव्य सोनवणे यांनी केलं. लोक आपल्यावर टीका करत असले, तरी मतदानाच्या वेळी आपल्यालाच पसंती देतील, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, खासदार झाल्यानंतर आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या खासदारांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. 'यापूर्वीच्या खासदाराने कुठे रस्ता केला हे विचारु का?' असा सवाल करत त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले. यापूर्वीच्या खासदाराने कोणत्या भागात रस्ते केले, कुठे नाल्या बांधल्या, याचा हिशेब विचारण्याची भूमिका त्यांनी मांडली.

दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करत आपला राजकीय वारसदारही जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पुढील काळात राजकीय समीकरणे कशी बदलणार आणि सोनवणे यांच्यासमोर कोणते आव्हान उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT