Bajrang Sonwane with Dhananjay Sonwane and Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane : प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सोनवणेंच्या मनात चाललंय काय?

Datta Deshmukh

Beed Political News : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘शेतकरी पुत्र’ असा नारा देऊन वातावरणनिर्मिती केली होती. आताही त्यांच्या सोशल मीडियावर पक्षाऐवजी पुन्हा ‘शेतकरी पुत्र’ असाच नारा दिसत आहे. यातून ते आताही निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सोनवणे सत्तेत आलेल्या स्वत:च्या पक्षापासून दूरच राहत असल्याचे दिसत आहे.

बजरंग सोनवणे हे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे अत्यंत निकटवर्तीय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विश्वासू मानले जातात. केज तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सोनवणेंनी आपली राजकीय ताकद वाढवली आहे. सोनवणे यांचा येडेश्वरी शुगर हा जिल्ह्यातील आघाडीच्या साखर कारखान्यांपैकी एक आहे. या कारखान्याच्या जोडीला त्यांनी आणखी धाराशीव जिल्ह्यातही साखर कारखाना घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी मिळण्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता. सोनवणे यांनी ‘शेतकरी पुत्र’चा नारा देत निवडणुकीत रंगत आणली. पराभवानंतर पक्षाने त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही दिले. आता अजित पवार सत्तेत सहभागी झाले असले तरी बजरंग सोनवणे पक्षाच्या प्रवाहातून दूर आहेत.

सोनवणे गेल्या वर्षभराच्या काळात पालकमंत्री मुंडेंच्या जिल्हा दौऱ्यात त्यांना भेटले नाहीत. ते कुठल्याही कार्यक्रम किंवा जिल्हा नियोजन समिती बैठकीतही दिसले नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीच्या वाट्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, अशीही माहिती आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनामुळे आपण कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. पण, आता नेत्यांना गावबंदी संपली असून, सर्वांचे नियमित कार्यक्रम सुरू झाले आहेत. मात्र, बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा ‘शेतकरी पुत्र’ असाच सूर आळवत लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरण्याची तयारीत असल्याची चर्चा आहे.

कुठल्याही सार्वजनिक समारंभ, विवाह सोहळा भेटीतील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताना ‘राष्ट्रवादीचे नेते’ऐवजी ‘शेतकरी पुत्र’ असाच नारा दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम, जिल्ह्यात राष्ट्रवादीचा (NCP) वरचष्मा असतानाही बजरंग सोनवणे यांचे पक्षापासून दूर राहणे कार्यकर्त्यांत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत धाराशीव जिल्ह्यातील कळंब मतदारसंघातही कारखान्याच्या निमित्ताने संपर्क वाढवला होता. मात्र, आता त्यांचा ‘शेतकरी पुत्र’ हा नारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT