Beed Jail News : विलास घुले प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्यासाठी बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडने कट रचला होता, असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या संदर्भातील पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप समोर आणली, यातील आवाज वाल्मिक कराड याचाच असल्याचा दावा करत, तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासा, असे आव्हान देखील सोनवणे यांनी दिले.
बीड जिल्हा कारागृहाचे प्रशासन वाल्मिक कराडवर मेहरबान असून जेलमध्ये त्याला तब्बल ३२ सीमकार्ड दिले गेले आहेत. यापैकी २२ कार्डचा वापर त्याने बाहेर फोन करण्यासाठी केल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. एवढे सीम कार्ड कराडकडे आले कुठून? असा सवाल करतानाच वाल्मिकने बीड कारागृहातील कर्मचाऱ्यांना आयफोन वाटल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
एवढे महागडे फोन या कर्मचाऱ्यांकडे आले कुठून याची चौकशी करा, अशी मागणी करत बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा कारागृह प्रशासनावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार पुत्र सौरव सोनवणेला अडकवण्यासाठी कराड याने सुग्रीव कराड यांच्या मार्फत केज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फोन केला, असा आरोप करत बजरंग सोनवणे यांनी या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप माध्यमांना ऐकवली.
बीड जेल प्रशासन, कारागृह अधिक्षक कराडवर कसे मेहरबान आहेत, याचे अनेक दाखले सोनवणे यांनी दिले. वाल्मिकसह त्याच्या जेलमधील सहकाऱ्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते, याची चौकशी करा, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी यापुर्वीच पत्राद्वारे केली होती. त्यानंतर आज आपल्या व मुला विरुद्ध कराड याने जेलमधून कसा कट रचला? यावर त्यांनी सविस्तर निवेदन केले.
वाल्मिकच्या बराकीत सीसीटीव्ही नाही..
वाल्मिक कराड जेलमध्ये ३२ सीम कार्ड वापरतोय. त्यातील वीस फोनवरून तो बाहेर बोलला आहे. यामध्ये जेल प्रशासन आणि काही कर्मचारी सहभागी आहेत. कारागृहातील एका बराकीमध्ये ६० ते ६५ कैदी ठेवण्यात आले आहेत. पण वाल्मीक असलेल्या बराकीत फक्त २५ ते ३० कैदी आहेत. या बराकीत सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत? असा दावा करतानाच आधीच्या कारागृह अधिक्षक गायकवाडला का बदलले? नव्या चांदणे यांची नियुक्ती का केली? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला.
कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते, याची चौकशी करण्याची मागणी आपण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून पोलिसांना पत्र आलेले आहे. त्यानंतर चौकशी केली गेली. पण दोन गरीब कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली. खरे दोषी, जेल प्रशासनावर कारवाई कधी करणार? असा सवाल करत जेल प्रशासन, कारागृह अधिक्षकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आपण पोलीस अधिक्षकांकडे करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगीतले.
कारागृहात पारखे डॉक्टरच का? कराड प्रकृतीचे कारण दाखवून अनेकदा जेलमधून बाहेर आला. पारखे नावाचा एक डॉक्टर कारागृहात नेमण्यात आला आहे. नेमका पारखेच का नियुक्त करण्यात आला? असा सवालही सोनवणे यांनी केला. तो बदलला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. माझ्या तक्रारीवरून जेव्हा जेल प्रशासनाने वाल्मिक आणि त्याच्या साथीदारांच्या फोन कॉलची चौकशी सुरू केली, त्यानंतर इतर कैद्यांना नियमाप्रमाणे आपल्या कुटुंबियाशी किंवा बाहेर करण्यासाठी फोन करण्याची सुविधा बंद करण्यात आली, असा आरोपही सोनवणे यांनी केला.
बीड कारागृहातील अतिरिक्त कैदी इतर ठिकाणी पाठवले पाहिजे. धनंजय देशमुख यांनी यापुर्वीच अशी मागणी केली होती. पण ती मान्य करण्यात आली नाही. इतर कैद्यांना हर्सूल कारागृहात पाठवण्यात आले. पण वाल्मिक व इतरांना मात्र हलवले गेले नाही. त्यांना नागपूर कारागृहात का पाठवत नाही? असा प्रश्नही सोनवणे यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.