Beed Politics : एखाद्या छोट्याशा गावात मंत्री, आमदार, खासदार आला की त्याच्या मागेपुढे फिरण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. ज्याला आपण निवडून दिले, त्याने कधी आपल्या गावाकडे, प्रश्नांकडे ढुंकून तरी पाहिले का? असा प्रश्नही कोणाला पडत नाही. पण काही तरूण याला अपवाद असतात. गेवराई तालुक्यातील भारवंटा गावच्या युवकाने भर कार्यक्रमात माईक हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना 'आमच्या गावचा विकास कधी करणार'?, असा थेट जाब विचारला. माझ्या गावातील १०५० पैकी १००५ मते तुम्हाला मिळाली आहेत, अशी आकडेवारीही त्याने सांगितली.
खासदार बजरंग सोनवणे यांच्या जनसंपर्क दौऱ्यातील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खासदाराला जाब विचारणाऱ्या या युवकाच्या धाडसाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. गेवराई तालुक्यातील भारवंटा गावात विकासाच्या मुद्द्यावरून आणि रखडलेल्या रस्त्यांच्या त्रासावरून एक तरुण थेट खासदार बजरंग सोनवणे यांच्यासमोर उभा ठाकला.
निवडणुका संपल्यानंतर नेतेमंडळी साधी विचारपूसही करत नाहीत, अशा संतप्त भावना व्यक्त करत तरुणाने खासदार बजरंग सोनवणे यांनाच धारेवर धरले. भारवंटा गावात एकूण १०५० मतदान असताना, त्यापैकी तब्बल १००५ मतदान महायुतीच्या उमेदवाराला झाल्याची आठवण या तरुणाने खासदारांना करून दिली. निवडणुका जिंकून गेल्यानंतर जनता कशी वाऱ्यावर सोडली जाते, याचे विदारक चित्र मांडताना तरुणाने संताप व्यक्त केला.
मी तुम्हाला शंभर वेळा फोन केला असेल, पण तुम्ही एकदाही माझा फोन उचलला नाही, असा थेट हल्ला चढवत या तरुणाने बजरंग सोनवणे यांची चांगलीच अडचण केली. गावातील रस्त्यांच्या दयनीय अवस्था सांगताना गुडघ्या इतके खड्डे पडले आहेत, जाताना एक फेरफटका मारून जावा, असा टोलाही त्याने लगावला. तुम्ही एसी गाडीत फिरता, पण एकदा आमच्या गावाच्या रस्त्यावरून फेरफटका मारा, तेव्हा कळेल आमचे काय हाल होत आहेत? अशा शब्दांत या तरूणाने आपला संताप व्यक्त केला.
निवडणुकीच्या काळात मतांसाठी दारात येणारे नेते त्यानंतर गावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, किमान आता दुष्काळात तरी आमच्या पाण्याची सोय करा, अशी मागणीही त्याने सोनवणे यांच्याकडे केली. जाहीरपणे एका मतदाराने अशी खरडपट्टी केल्यावर सोनवणे यांनी त्याच्या हातातून माईक घेतला, झाले का तुझे? असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.