Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte sarkarnama
मराठवाडा

Beed : ॲड. सदावर्तेंचा पाय खोलात ; बीडमध्येही गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

बीड : मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर रविवारी (ता. १७) येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. भाजपचे बीड (Beed) तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. गुणरत्न सदावर्ते यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला ५० हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणाही गलधर यांनी केली होती. (Marathwada)

गलधर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते स्वराज्यनगर येथे घरी होते. यावेळी एका डॉक्टरांनी व्हॉटसअपवर पाठविलेला व्हिडिओ त्यांनी डाऊनलोड करुन पाहिला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले.

मराठा आरक्षण हे मोगलाई पध्दतीने लुटले जाऊ शकत नाही. पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचे राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व ५२ मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही.

अखेर सुप्रिम कोर्टाने अँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केले. याशिवाय दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲड. सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले.

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अवमान करुन भीती पसरविल्याचा ठपका ठेऊन विविध कलमाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.

दरम्यान,मुंबईत खासदर शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. याप्रकरणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली होती. त्यानंतर सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ताबा घेतला.

दीड वर्षांपूर्वी खासदर उदयनराजे भोसले व खासदर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात सदावर्ते यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. १६ एप्रिल रोजी त्यांना सातारा न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पाठोपाठ बीडमध्येही गुन्हा नोंद झाल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT