बीड : भाजपच्या खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रितम मुंडे यांनी राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कोविड काळातील कामाचे जाहीर कौतुक केले. शिवाय, भोंग्यांच्या विषयावरुन त्यांनी नाराजीही व्यक्त केली. (Beed) कोविड संसर्गाच्या दोन वर्षांतील हाहाकार, उपाय योजना, उपचार यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर शरसंधान सुरु आहे. मात्र, खासदार मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले. (Marathwada)
येथील जिल्हा रुग्णालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित आरोग्य मेळाव्यात त्या बोलत होत्या. महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, कोविड संसर्गाच्या काळात सर्व जगातच हाहाकार सुरू होता. महासत्ता म्हणवून घेणारे देश देखील हातबल होते. मात्र, देशाने जगाला आदर्श घालून दिला. व्हीजन पंतप्रधानांचे असले तरी राज्यानेही खंबीर साथ दिल्याने हे शक्य झाले. जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या देशात तुलनेने सुविधा कमी, आर्थिक मागासलेपण, शिक्षणाचा अभाव असूनही खूप चांगले काम झाले.
आरोग्याचा विषय आला की मी डॉक्टर असल्याने यात राजकारण नसावे असे मला वाटते. आपण संवेदनशिल आहोत. आरोग्य क्षेत्राला राजकारणापासून दुर ठेवायला हवे. आरोग्याच्या यज्ञात कोणी राजकारणाचा खोडा घालू नये, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमानंतर माध्यमांना प्रतिक्रीया देताना त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कामाचेही कौतुक केले.
कोव्हीड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून चांगले काम केल्याचे प्रितम मुंडे म्हणाल्या.
मनसेच्या भोंगे वाटपाला भाजपने पाठींबा दिला आणि काही ठिकाणी भाजप नेत्यांकडूनही भोंगे वाटप होत असताना मात्र धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना याला सामोरे जावं लागणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सध्या शिवसेना व भाजपमध्ये भलतेच राजकीय वैर सुरु आहे. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या संगीता चव्हाण यांची महिला आयोगाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार केला. पुर्वी अनेक वर्षे सोबत काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.