Beed Assembly Election 2024  Sarkarnama
मराठवाडा

Beed Assembly Election: मराठवाड्यात मातब्बर राजकीय घराण्यातील तीन काका-पुतणे रिंगणात

Kshirsagar Family and Beed Politics: एकेकाळी मातब्बर राजकीय घराण्यातील दिवंगत केशरबाई क्षीरसागर एकदा आमदार व दोनदा खासदार होत्या. पुढे त्यांचे पुत्र जयदत्त क्षीरसागर यांनी देखील चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करताना उपमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी राजकीय कारकीर्द गाजवली.

Datta Deshmukh

Beed News: बीड विधानसभा निवडणूक रिंगणात यंदा तीन काका पुतण्यांनी अर्ज दाखल केले आहेत. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

डॉ. क्षीरसागर यांनी तर अर्ज काढून घेण्यासाठी नाही तर विधानसभेत जाण्यासाठी अशी घोषणा केली आहे. आता तिन्ही क्षीरसागर रिंगणात राहून खरोखरच एकमेकांना टक्कर देणार का कोणी रिंगणातून पळ काढणार पाहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील एकेकाळी मातब्बर राजकीय घराण्यातील दिवंगत केशरबाई क्षीरसागर एकदा आमदार व दोनदा खासदार होत्या. पुढे त्यांचे पुत्र जयदत्त क्षीरसागर यांनी देखील चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करताना उपमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी राजकीय कारकीर्द गाजवली. मात्र, 2016 पासून क्षीरसागर कुटुंबात काका-पुतण्या अंक सुरू झाला.

अगोदर संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले. मागच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर शिवसेनेकडून उमेदवार होते. मागच्या वर्षी त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्षपद मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला. जयदत्त क्षीरसागर अपक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यांनी समर्थकांचा मेळावा घेत विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

महायुतीत शिवसेनेची जागा असलेल्या बीडवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करत डॉ. क्षीरसागर यांच्यासह इतरांना उमेदवारीचा शब्द नेत्यांनी दिला होता. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत या जागेचा तिढा कायमच आहे. मात्र, डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही आता माघार नाही म्हणत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बीडमधून 49 उमेदवारांचे सोमवारपर्यंत अर्ज दाखल झाले होते. पण, एकाच वेळी क्षीरसागर कुटुंबातून तिघांनी अर्ज दाखल केल्याने आता माघार कोण घेणार का एकमेकांना टक्कर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT