Beed Crime News: बीड तालुक्यातील बाळापूर शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पाचे काम जबरदस्तीने बंद पाडून कंपनीकडे १० लाखांची खंडणी मागितल्याची आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टोरंट सोलर पॉवर लिमिटेड कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारणीसाठी बाळापूर येथील गट क्र. ३०९ मधील जमीन कायदेशीर भाडेपट्ट्याने घेण्यात आली आहे. महसुली दप्तरी कायदेशीर नोंद आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एनर्जी इन्फ्रा प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून विकास व उभारणीचे काम सुरू होते.
यादरम्यान संशयित आरोपी महादेव बाजीराव जाधव, कृष्णा महादेव जाधव, गणेश महादेव जाधव, अविनाश परमेश्वर जाधव (सर्व रा. बाळापूर), सीमा विशाल अंधारे (रा.भांडगाव, ता. भूम), सोपान मोरे (रा.बीड) आणि आबा केंमदरे (रा.बाळापूर) यांनी संगनमत करून कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोपींनी संबंधित जमिनीत अनधिकृतपणे शेती करत असल्याचे भासवून आणि जुन्या कराराचा मुद्दा उपस्थित करून प्रकल्पाचे काम बंद पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काम पुन्हा सुरू ठेवायचे असल्यास १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, काम सुरू ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन क्रेन व इतर मशीन बंद पाडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
प्रकल्पाचे काम वारंवार बंद पडल्यामुळे कंपनीचे आतापर्यंत ८० ते ९० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रकल्पावरील कर्मचारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची मागणी, कामात अडथळा आणि धमकी या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.