Beed Kidnapping Incident: बीड जिल्ह्यातील परळी येथील एका कंत्राटदाराच्या अपहरणाची आणि तब्बल पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरताच, छापेमारी सुरू करताच, अपहरणकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.
परळी इथल्या तुकाराम मुंडे हे विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. 4 जून रोजी दुपारी काम आटोपून घरी परतत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या घटनेमुळे परळीसह संपूर्ण बीड (Beed) जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तपासाची व्याप्ती वाढत अमरावती परिसरापर्यंत पोहोचल्याने अपहरणकर्त्यांवरील पोलिसांचा (Police) दबाव अधिक वाढला होता.
दरम्यान, 7 जून रोजी तुकाराम मुंडे यांना वर्धा जिल्ह्यातील धोत्रा परिसरातील एका निर्जन रस्त्यालगत डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आले. काही वेळानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या आंजदा येथील प्रसन्ना घेमराज मांडवकर यांनी त्यांना पाहिले आणि तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
मांडवकर यांनी विचारपूस केल्यानंतर मुंडे यांनी आपले अपहरण झाल्याची आणि कुटुंबीयांकडे खंडणी मागितल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रसन्ना मांडवकर यांनी कोणताही वेळ न दवडता त्यांना दुचाकीवरून थेट हिंगणघाट पोलिस ठाण्यात नेले.
हिंगणघाट पोलिसांनी तत्काळ मुंडे यांच्या कुटुंबीयांशी तसेच परळी पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना परळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी सांगितले की, या प्रकरणाचा वर्धा जिल्ह्याशी कोणताही संबंध नसून संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासानुसार, पोलिसांची वाढती छापेमारी, तपासाची वाढलेली व्याप्ती आणि आरोपींवरील वाढता दबाव यामुळेच अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंडे यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सक्रिय असून पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.